सावंतवाडीत उद्या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

सावंतवाडी/ प्रतिनिधी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचे संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्ट रोजी उपरालकर देवस्थान येथून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब व जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी दिली.
सोमवारी होणाऱ्या या तिरंगा यात्रेची सावंतवाडीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत रविवारी सावंतवाडीतील उपरालकर देवस्थान व श्री देव पाटेकर देवस्थान येथे भेट देऊन आशीर्वाद घेण्यात आला. सावंतवाडीत होणाऱ्या तिरंगा यात्रेला जवळपास अडीच ते तीन हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती दीपाली भालेकर, माजी नगरसेवक राजू बेग, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
येत्या सोमवारी, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपरालकर देवस्थान येथून भव्य तिरंगा रॅलीला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमातून देशप्रेमाची भावना जागृत केली जाणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील माजी सैनिक, देशप्रेमी नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या रॅलीचे आगमन सकाळी ९.३० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार असून, ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यात येणार आहे. तसेच शहरात पाच ठिकाणी विशेष तिरंगा सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत माजी सैनिक, विद्यार्थी, वीरमाता आणि वीरपत्नी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दि. १० ते १३ ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भव्य-दिव्य तिरंगा यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व नियोजन पूर्ण झाले असून, यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Source link



