भारतीय मुलांचा पाकिस्तान, ओमानवर विजय

वृत्तसंस्था, मस्कत
येथे सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी फाईव्ज आशियाई स्पर्धेतील एलिट पूलमध्ये भारतीय सब ज्युनिअर मुलांच्या संघाने पाकिस्तान आणि ओमानचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली.
केतन कुशवाहाच्या नेतृत्वाखाली भारताने सुरुवातीला ओमानवर 14-0 असा दणदणीत विजय मिळवला. यात कर्णधाराने चार गोल (6, 11, 15, 20) केले. आशिष तानी पुर्तीने (1, 16, 19) हॅट्ट्रीक साधली तर राहुल यादव (2, 12) आणि शाहरुख अली (3, 13) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. प्रल्हाद राजभरने 9 व्या मिनिटाला, करण गौतमने 15 व्या आणि रोमित पालने 18 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 7-4 असा विजय मिळवला. करण गौतमने 5, 9 व 19 व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रीक पूर्ण केली. भारतासाठी राहुल यादवने तिसऱ्या, प्रल्हाद राजभरने 10 व्या, कर्णधार कुशवाहाने 11 व्या आणि रोमित पालने 11 व्या मिनिटाला इतर गोल केले. पाकिस्तानसाठी अस्लम मुहम्मद फरहानने 6 व्या, आदीलने 8 व्या, उस्मान मुहम्मदने 10, 16 व्या मिनिटाला गोल केले.
मुलींची चीनशी बरोबरी, उझबेकवर मोठा विजय
दरम्यान, भारतीय उपकनिष्ठ मुलींच्या संघाला चीनविरुद्धच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधावी लागली. मात्र त्यानंतर एलिट पूलमधील दुसऱ्या सामन्यात त्यांनी उझबेकिस्तानचा 16-0 असा धुव्वा उडवला. चीनच्या चेन गे (4) हिने संघाला आघाडी मिळवून दिल्यानंतर भारताला सामन्याच्या बहुतांश भागात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र नौशीन नाझने (16, 17) दोन गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तरीही जियाक्सिन गुओने (19) सामन्याच्या अखेरीस गोल करून बरोबरी साधली आणि चीनला गुण मिळवून दिले.
त्यानंतर भारताने उझबेकिस्तानवर वर्चस्वपूर्ण विजय मिळवत दिवसाची सांगता केली. यात नौशीन नाझने (6, 9, 15, 16) पुन्हा एकदा चार गोल केले. संदीपा कुमारी (2, 6, 20) आणि कर्णधार स्वीटी कुजूर (10, 13, 20) यांनी हॅट्ट्रीक साधली तर दिया (3, 17) आणि पुष्पा मांझी (11, 13) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. किरण एक्का (8) आणि निलम टोपनो (18) यांनीही गोल नोंदवले. ही स्पर्धा पहिल्या एफआयएच युथ हॉकी फाईव्ज हॉकी विश्वचषकासाठी पात्रता फेरी म्हणून ओळखली जात आहे.
Source link



