सोनुर्लीतील बीएसएनएल टॉवर बंद – Tarun Bharat

न्हावेली /वार्ताहर : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावातील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने गावातील नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. टॉवरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि वेलींनी विळखा घातल्याचे चित्र असून, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
सोनुर्ली हे प्रसिद्ध माऊली मंदिरामुळे ओळखले जाणारे गाव आहे.वर्षभर येथे विविध भागांतून भाविक येत असतात. मात्र,बीएसएनएलचा टॉवर असूनही तो सतत बंद राहत असल्याने परिसरात मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे फोन कॉल, इंटरनेट सेवा तसेच ऑनलाइन व्यवहार करताना नागरिक व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, टॉवरच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वेलींनी संपूर्ण संरचनेला वेढा घातला असून, त्याची नियमित देखभाल होत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे टॉवर “असूनही नसल्यासारखा” झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे बीएसएनएल प्रशासनाने तातडीने टॉवरची दुरुस्ती करून परिसरातील झाडाझुडपे हटवावीत आणि मोबाईल सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांसह भाविकांकडून करण्यात येत आहे.
Source link



