Maharashtra Rain | पुढील 4 दिवस सावधान! कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – मुंबईत पावसाचा जोर अजूनही कायम असून शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार सरी कोसळत आहेत. रात्रीपासून सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना वाहतुकीत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबई परिसरात दिवसभर काळ्या ढगांचे दाट आच्छादन पाहायला मिळत आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असून किनारपट्टीवरील परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली असून परिसर धुक्याने वेढल्यासारखा दिसत आहे. प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
सततच्या पावसाचा परिणाम मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीवरही दिसून येत आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकल सेवा सुमारे दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
आज राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
याशिवाय पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्रातजोरदार पावसाचा अंदाज-
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे..
Source link



