उबर इंडियाची प्रभजीत सिंह यांनी सोडली साथ

ओपनएआयमध्ये होणार रुजू : दिला पदाचा राजीनामा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
उबर इंडियाचे सीईओ प्रभजीत सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता सप्टेंबरमध्ये चॅट जीपीटी निर्माती कंपनी ओपन एआच्या भारत ऑपरेशनचे देशाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून कार्यरत होणार आहेत. प्रभजीत सिंह हे भारतात ओपन एआयचे सर्वात मोठे वरिष्ठ नेते म्हणून सामील होणार आहेत. याच वर्षी मार्चमध्ये ओपन एआयच्या आशिया पॅसिफिक व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झालेल्या किरण मणी यांना ते आपल्या कामाचा अहवाल देतील.
ओपन एआयचे कामकाज सांभाळणार
ओपनएआय यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभजीत सिंह हे भारतातील कंपनीच्या ग्राहक विकासाबाबत, व्यवसाय भागीदारी, नियमावली आणि कामकाजासंबंधीची जबाबदारी सांभाळणार आहेत. भागीदारी बनवण्यासोबतच भारतातल्या एआय इकोसिस्टीमला सहकार्य करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे.
10 वर्षाचा अनुभव
आयआयटी कानपूर, आयआयटी अहमदाबाद यामधून त्यांनी आपली पदवी प्राप्त केली असून उबरमध्ये ते भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवसाय अध्यक्ष म्हणून काम करत होते. जवळपास दहा वर्षे त्यांनी उबरमध्ये काम केले आहे. या दहा वर्षांमध्ये भारतात उबरच्या विकास आणि विस्तारासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. ऑगस्ट 2015 मध्ये प्रभजीत हे उबरमध्ये जनरल मॅनेजर, हेड ऑफ स्ट्रॅटेजी म्हणून कार्यरत झाले होते. जून 2020 मध्ये ते अध्यक्ष झाले.
नव्या नेतृत्वाचा शोध
प्रभजीत यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी आता नव्या नेतृत्वाची निवड करावी लागणार आहे. याच दरम्यान उबरच्या अधिकाऱ्यांनी सीईओ प्रभजीत सिंह यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. उबर ही कंपनी टीमच्या योग्य त्या कामगिरीसोबत मजबूत अशी वाटचाल करत आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये नेतृत्व सांभाळण्यासाठी नव्या नेत्याची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Source link



