सिया गोयलचे वकील कोण? कोर्टातच रंगणार मोठा संघर्ष

पुणे: पुण्यात सध्या गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे वाद आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या चौकशीदरम्यान अनेक बाबी उघड होत असतानाच, आता सियाचे कोर्टात प्रतिनिधित्व कोण करणार यावरून दोन वकिलांमध्येच नवा संघर्ष उभा राहिला आहे. एका बाजूला अॅडव्होकेट विपूल दुशिंग यांनी सियाच्या संमतीने वकीलपत्र स्वीकारल्याचा दावा केला आहे, तर दुसऱ्या बाजूला अॅडव्होकेट श्रीवास्तव यांनीही आपणच तिचे वकीलपत्र घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं अधिकृत प्रतिनिधित्व कोणाकडे आहे, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला असून याचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तपासाची गती वाढवली असून नुकतेच आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना लोहगडावर नेऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पुनर्रचना करण्यात आली. त्या वेळी दोघांकडून घटनेचा नेमका क्रम समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, चौकशीत सिया आणि चेतन या दोघांनीही गुन्ह्याची मुख्य जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली अंतिम कृती नेमकी कुणी केली, यावर दोघांचेही जबाब परस्परविरोधी असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
त्यामुळे पोलिसांकडून आता उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांची बारकाईने पडताळणी केली जात आहे. याच प्रकरणात आज दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासासाठी पोलीस आणखी कोठडीची मागणी करणार की आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सियाचे कुटुंबीय आणि केतन अग्रवालच्या नातेवाईकांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, आज कोर्टात होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Source link



