Nasrapur Case “मी तिला खाऊ द्यायला गेलो होतो अन् तिच्या डोक्याला” नसरापूरच्या नराधमाने अखेरपर्यंत मान्य केलं नाही

महाराष्ट्राला सून्न करुन टाकणाऱ्या नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात अखेर न्यायालयाने नराधम भिमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. लैंगिक अत्याचाराची ही घटना इतकी सैतानी होती की साडेतीन वर्षांच्या बालिकेवर ३९ मिनिटे अमानुष अत्याचार करुन तिच्या शरीरावर नराधम भिमराव कांबळे याने १८ जखमा केल्या होता. पोलीस तपासात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही उघड झाले होते.
आज 60 दिवसांत या खटल्याचा निकाल लागला आणि पिडीत बालिकेला न्याय मिळाला. नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या मुलीवरील अत्याचार करून तिचा खून करणारा भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आज हा निकाल दिला.
या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण झाल्याने हा खटला अल्पावधीत निकाली निघाला. गुन्हा घडल्यापासून केवळ दोन महिन्यांत हा खटला निकाली निघाला आहे. एकूण १३७ पानांचा हा निकाल आहे.
पुर्वीच्या सुनावणीत आरोपीचा नकार
25 जून रोजी झालेल्या शिक्षेबाबत सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपी भीमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, “तो प्रसंग आठवून सांग, तुला कोणती शिक्षा द्यायला हवी?” असा प्रश्न विचारला. त्यावर आरोपी भिमराव कांबळेने आपण मुलीला खाऊ घेण्यासाठी नेले होते आणि पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावत गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. आज न्यायालयाने आरोपीचा कोणताही अतार्किक युक्तिवाद अमान्य करत पिडीत बालिकेला न्याय मिळवून दिला.
पोलीस आणि यंत्रणांचा समन्वय
आरोपी भीमराव कांबळेने केलेल्या या अमानवी कृत्याचा तपास करताना सरकारी यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने उत्तम समन्वय साधल्याचे दिसले. ग्राम पंचायत आणि नागरिकांनी बसविलेल्या सीसीटीव्हीमुळे आरोपी शोधणे सोपे झाले. या तपासात पोलिसांच्या कर्तव्याला इतर शासकीय विभागांची उत्तम साथ मिळाली.
तपासादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक वैद्यकीय तपासण्या वेळेत पूर्ण केल्या, तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेनेही तातडीने अहवाल उपलब्ध करून दिले. या समन्वयामुळेच निकालाची प्रक्रिया लवकर पूर्ण झाली.
राज्य सरकारने या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आणि न्याय व विधी विभागाने आदेश काढून खटला ‘फास्ट ट्रॅक’वर आणला. तीन अल्पवयीन मुलांसह इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. विशेष म्हणजे न्यायालयाने तर सुटीच्या दिवशीही सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग सुनावणी घेत साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या.
Source link



