दुहेरी संकट

व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या भूकंपामुळे संपूर्ण जगालाच हादरा बसला आहे. प्रचंड तेलसंपदा, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटामुळे आधीच हा देश विविध प्रश्नांच्या गर्तेत आहे. अशातच भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे व्हेनेझुएला दुहेरी संकटात सापडल्याचे दिसून येते.
व्हे नेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील उत्तरेकडील कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावरील देश. जगातील सुमारे सात टक्के खजिन तेलसाठे आणि तीन टक्के नैसर्गिक साठे या देशात आहेत. याशिवाय लोहखनिज, बॉक्साईट, सोने, हिरे, कोळसा याचे साठेही या देशात आढळतात. एकेकाळी हा देश लॅटिन अमेरिकेतील सर्वांत श्रीमंत देश होता. मात्र, हुकूमशाही, भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापनामुळे या देशावर नंतरच्या काळात अक्षरश: भिकेकंगाल होण्याची वेळ आली. ह्युगो चावेझ यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देशात सरकारी तिजोरीतून वारेमाप लयलूट झाली. मादुरी यांच्या काळातही हा सिलसिला कायम राहिला. विरोधी पक्षनेत्यांचा छळ, निवडणुकीतील भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन, लोकशाहीचा संकोच यामुळे हा देश राजकीयदृष्ट्या अधिकाधिक अस्थिर होत गेला. महागाई, वाढती गरिबी व आर्थिक दिवाळखोरीमुळे व्हेनेझुएला अराजकतेकडेच ढकलला आहे. स्वाभाविकच ही संधी साधून या तेलसमृद्ध देशाचा ताबा घेण्यासाठी अमेरिकेसारखा देश पुढे सरसावला. अलीकडेच अमेरिकेने व्हेनेझुएलातील तेलसाठ्यांवर आपले नियंत्रण व वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. मागच्या काही दिवसांत येथील राजकीय व सामाजिक वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले असून, अनेक देशबांधवांनी येथून काढता पाय घेतला आहे. अशा सगळ्या अस्थिर व अस्वस्थ स्थितीत देशात झालेला भूकंप विनाशकारीच म्हणावा लागेल. यातील पहिला 7.2 रिश्टर स्केलचा धक्का व दुसऱ्या 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याने राजधानी काराकासमधील जनजीवन कोलमडून पडल्याचे पहायला मिळते. यात 164 जण मृत्युमुखी पडल्याचा आकडा सांगण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात हा आकडा हजारोंमध्ये असल्याचे बोलले जाते. अनेक भागांत इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या दिसतात. मुख्य म्हणजे सार्वजनिक सुटीच्या दिवशी हा भूकंप झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे म्हणण्यास वाव आहे. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दहा हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याची व्यक्त केलेली भीती, हा त्याचाच भाग. याशिवाय ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. भारतासह विविध देश मदतकार्याकरिता पुढे सरसावले असून, अशा काळात या देशाला मदतीचा हात देणे, हे प्रत्येक देशाचे कर्तव्य ठरते. मुळात येथील समाजमन सध्या वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी भूकंपाने त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणखी एक घाला घातला आहे. हा प्रसंग व्हेनेझुएलावासियांसाठी नक्कीच अतिशय कठीण असेल. त्यामुळे येथील लोकांना केवळ मदत करून भागणार नाही. तर त्यांना मानसिक आधारही द्यावा लागेल. वास्तविक भूकंप हे नैसर्गिक संकट होय. आजवर अनेक राष्ट्रांना भूकंपाने धक्के दिले आहेत. व्हेनेझुएलासह जपान, नेपाळ, तुर्कस्तान या देशांनी ही आपत्ती काय असते, हे अनुभवले आहे. आपला भारत देशही भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. भारतानेही अनेक भयंकर भूकंप पाहिले आहेत. त्यांची तीव्रता, हानी काय असते, याची प्रत्यक्ष प्रचिती घेतली आहे. खरे तर ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, वाढते शहरीकरण, अनियोजित बांधकामे, आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे नैसर्गिक आपत्तींचे परिणाम अधिक गंभीर होत आहे. म्हणून अशा घटनांमधून आता सर्वांनीच धडा घ्यायची गरज आहे. आजवर जपानला अनेकदा भूकंपाचे धक्के बसले. एकीकडे व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाला, त्यावेळी जपानमध्येही त्याच तीव्रतेचे धक्के बसले. तथापि, तेथे मोठी हानी झालेली दिसली नाही. याला कारण या देशाने विकसित केलेली भूकंप प्रतिरोधक यंत्रणा होय. जपानमधील घरे, कार्यालयांची रचना त्याला अनुसरून केली जाते. हे लक्षात घेता अन्य देशांनीही भूकंप प्रवण क्षेत्रात जपान पॅटर्नचा अवलंब करण्याबाबत आता प्रकर्षाने विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे. व्हेनेझुएलाच्या संकटातून हाच बोध घेता येईल.
Source link



