सांगेली येथील शांताराम मेस्त्री यांचे निधन

सांगेली गावचे अष्टपैलू व्यक्तिमत्व
ओटवणे : प्रतिनिधी
सांगेली देवकरवाडी येथील ज्येष्ठ प्रसिद्ध सुतार कारागीर तथा नाट्यकर्मी शांताराम उर्फ नाना कृष्णा मेस्त्री (७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन केले. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांताराम मेस्त्री उत्कृष्ट मूर्तिकार, चित्रकार तसेच गायक होते. त्यावेळच्या सांगेली दशावतार नाट्य मंडळात त्यांनी अनेक स्त्री पार्ट भूमिका साकारल्या. त्या आजही रसिकांच्या मनात कोरलेल्या आहेत. शिमगोत्सवात गावात खेळे कार्यक्रमात त्यांची राधाची आकर्षक भूमिका लक्षवेधी असायची. आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातून त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. टेम्पो चालक अभय मेस्त्री, गोवा येथे नोकरीला असलेले विठ्ठल मेस्त्री यांचे ते वडील होत तर मुंबईस्थित आर्टिस्ट उदय मेस्त्री यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, बहीण, भावजय, पुतणे, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Source link



