पावसाची जोरदार बॅटिंग

विक्रमी साडेतीन इंच नोंद : धरण क्षेत्रात मुसळधार : नद्या झाल्या पुन्हा प्रवाहित
पणजी : पावसाने पाठ फिरविल्याने आणि धरण क्षेत्रातील पाण्याचा तळ दिसू लागल्याने सर्वांनाच दुष्काळाची चिन्हे दिसत होती. जलस्रोत खात्यासह गोवा सरकार अडचणीत होते. तसेच शेतीची कामेही खोळंबल्याने शेतकरीवर्ग देखील प्रचंड अस्वस्थ होता. मात्र गेल्या दोन दिवसात पडत असलेला जोरदार पाऊस वातावरणात फार मोठे बदल घडवीत आहे. रविवारी सायंकाळी सुरू झालेला हा पाऊस गोव्यात अनेक भागात मुसळधार कोसळला. सोमवारी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्या दिवशी सायंकाळी उशिरा पावसाने जोर धरला आणि रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
मंगळवारी काणकोणात सर्वाधिक
सर्वाधिक साडेसात इंच पाऊस काणकोण या ठिकाणी पडला. म्हापसा साडेपाच इंच, केपे सव्वापाच इंच, सांगे पावणे पाच इंच, मडगाव साडेचार इंच,पेडणे साडेतीन इंच, साखळी तीन इंचापेक्षा जास्त, जुने गोवे आणि धारबंदोडा येथे प्रत्येकी तीन इंच पावसाची नोंद झाली. दाबोळी दोन इंच, पणजी दीड इंच, मुरगाव दीड इंच आणि फोंडा एक इंच पावसाची नोंद झाली.
सरासरी पावसाच्या टक्केवारीत वाढ
सरासरी साडेतीन इंच पावसाची नोंद गोव्यात झाल्यामुळे यंदाच्या मोसमातील पावसाच्या टक्केवारीमध्ये सुधारणा झाली. कालपर्यंत 70 टक्के कमी पावसाची नोंद होती, त्याऐवजी आता ती 58 टक्क्यापर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासातील साडेतीन इंचाच्या पावसामुळे यंदाच्या मोसमात पडलेला पाऊस आता 11 इंच झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सर्वत्र जोरदार पाऊस पडला. त्याचबरोबर वादळी वारे देखील वाहले आणि अनेक ठिकाणी वृक्ष उनमळून पडले. अग्निशामक दलाला सातत्याने मदतीसाठी कॉल येऊ लागले.
डोंगराळ भागात जोरदार बॅटिंग
या पावसाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे हा पाऊस डोंगराळ भागात पडला असून त्या ठिकाणी मुसळधार पडल्यामुळे गोव्यातील अनेक धरण क्षेत्रात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणामध्ये मंगळवारी दोन सेंटीमीटरने पाण्याची पातळी वाढली. पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडला तर डोंगरातून कोसळणाऱ्या धबधब्यातून येणारे पाणी थेट धरण क्षेत्रात जाईल. त्यामुळे धरणात पाणी जमा होईल त्यातून गोव्याची चिंता मिटणार. सध्या असलेला पाणीपुरवठा केवळ 30 दिवसांपुरताच आहे. गेल्या तीन दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक परिस्थिती आहे.
वाळवंटी नदी झाली प्रवाहित
साखळी, डिचोली, होंडा, आमोणे, मये इत्यादी भागात सर्वत्र जलपुरवठा करणाऱ्या साखळीच्या वाळवंटी नदीचा प्रवाह गेल्या दोन दिवसाच्या जोरदार पावसामुळे प्रवाहित झाला आहे. मंगळवारी सकाळपासूनच धरणातील बांधावरून पाणी वाहू लागले. महाराष्ट्रातील विर्डी गावातील नदीचा प्रवाह वाळवंटीमध्ये येतो आणि केरी येथे या दोन नद्यांचा संगम होतो. सोमवारी सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस कोसळल्याने विर्डी नदीचे पाणी वाळवंटीत आले आणि वाळवंटी पुन्हा प्रवाहित झाली. तसेच केरीच्या डोंगरावरून येणारे पाणी वाळवंटीत उतरले. त्यामुळे वाळवंटी पुन्हा एकदा जोमाने प्रवाहित झाली. त्यामुळे जनतेलाही आता पाण्याचा तुटवडा होणार नाही याची जाणीव झाली.
अंजुने धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
अंजुणे धरण क्षेत्रामध्ये गेल्या तीन दिवसात पडलेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या मोसमात पडलेला पाऊस आता बारा इंच झाला आहे. एवढ्यात दरवर्षी या ठिकाणी 27 ते 28 इंच पाऊस पडत असतो. आताच पावसाला सुऊवात झालेली असल्यामुळे यंदा धरण भरण्यासाठी थोडा ज्यादा कालावधी लागेल, असा अंदाज आहे. पुढील सहा दिवस तरी गोव्यात मुसळधार पाऊस येणार असल्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात येईल, असा अंदाज आहे.
उद्या ऑरेंज अलर्ट, सहा दिवस मुसळधार
हवामान खात्याने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात सर्वत्र पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासाठी सहा दिवस येलो अलर्ट जारी केला आहे, तर उद्या गुऊवारी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
Source link



