महाराष्ट्रातही पाणीटंचाई; पाणी सोडणे कठीण

मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद
बेळगाव : महाराष्ट्र राज्यातही सध्या तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेथून कर्नाटकासाठी पाणी सोडणे कठीण असल्याचे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यंदाच नव्हे तर मागील अनेक वर्षांपासून राज्य सरकारने महाराष्ट्राकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र अपेक्षित प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नाही. कोयना धरण पूर्णक्षमतेने भरलेले असतानाही पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. आता महाराष्ट्रातही पाण्याची कमतरता असल्याने तेथील अधिकाऱ्यांनी पाणी सोडणे शक्मय नसल्याचे कळविले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जारकीहोळी म्हणाले, बेळगाव शहराला पुढील दोन महिन्यांसाठी पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. ज्या भागात पाण्याची कमतरता भासेल, त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. तसेच कूपनलिका दुरुस्त करून त्या सार्वजनिकांच्या सेवेसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, याबाबत दक्षता घेतली जात आहे. बेळगाव शहरात 24 तास सातत्याने पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी सुरू असली तरी काही भागांमध्ये सध्या 15 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री जारकीहोळी यांनी योजनेची सर्व कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्ट केले. सध्या उपलब्ध पाण्याचे प्रमाण, वितरण यंत्रणा आणि तांत्रिक अडचणी विचारात घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. योजनेची कामे पूर्णत्वास गेल्यानंतर नियमित पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट साध्य होईल.
महापालिकेच्या कामकाजावर भाष्य करताना मंत्री जारकीहोळी यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली. शहरातील पाणीपुरवठ्यासह विविध नागरी समस्यांची पुरेशी व सविस्तर माहिती शासनापर्यंत पोहोचविण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. समस्यांबाबत स्पष्ट व अचूक माहिती मिळाल्यास शासनाला तातडीने उपाययोजना करणे व नागरिकांना दिलासा देणे शक्मय होते, असेही त्यांनी नमूद केले. राज्य मंत्रिमंडळ विस्तार व मंत्रिपदांच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात प्रत्येकाला मंत्री होण्याची इच्छा असते. मात्र सर्वांना संधी मिळेलच असे नाही, असे त्यांनी सांगितले. बेळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद निश्चित आहे. अतिरिक्त मंत्रिपद द्यायचे की नाही, याचा अंतिम निर्णय वरिष्ठ व हायकमांड घेतील. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना मंत्रिपद देण्याचे कोणतेही आश्वासन देण्यात आल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांना पाणीपुरवठ्यासाठी मर्यादा
बेळगावातील आगामी पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार घेतील. धारवाड औद्योगिक क्षेत्राला अतिरिक्त पाणीपुरवठा केला जात असल्याचे आरोप मंत्री जारकीहोळी यांनी फेटाळून लावत उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी निश्चित नियम व मर्यादा आहेत. त्याच चौकटीत पाणी दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार आसिफ सेठ उपस्थित होते.
कायदेशीर अटींचे पालन करणे बंधनकारक…
खासगी उद्योगांना मनमानी पद्धतीने पाणी वापरण्याची किंवा वाहतूक करण्याची परवानगी नसून त्यासाठीच्या सर्व कायदेशीर अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक हित बाधित होणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचेही मंत्री जारकीहोळी सांगितले.
Source link



