Gadhinglaj Murder सततची भांडणं, अंधारी रात्र अन् विळ्याचे सपासप वार…पतीने पत्नीचा केला क्रूर शेवट

कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची धारदार विळ्याने वार करुन खून केल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावात घडली आहे. या घटनेमुळे नूल गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पत्नीच्या खुनानंतर उसाच्या शेतात लपून बसलेल्या पतील पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार चित्रांजली भिमाप्पा चितारी (३८) असं खून झालेल्या महिलेचे नाव असून खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी महिलेचा पती भिमाप्पा चंद्राप्पा चितारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (21 जून) रोजी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
सततचे वाद आणि खून
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भिमाप्पा चितारी याचा नूल येथे शेतीसह गोठ्याचा व्यवसाय आहे शिवाय तो फॅब्रीकेशनचा व्यवसायही सांभाळतो. चितारी कुटूंबाने आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवले होते. दरम्यानच्या काळात पती – पत्नीमध्ये सतत किरकोळ कारणांवरुन वाद व्हायचे अखेर या वादाचा शेवट पत्नीच्य दुर्देवी खुनात झाला.
पत्नीचा क्रूरपणे शेवट केला
रविवारी रात्री दोघांच्यात घरासमोरच जोरदार वाद झाला. पती – पत्नीचे नेहमीचेच भांडण आहे असे समजून शेजाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले पण या वादात आरोपी पतीने पत्नी चित्रांजलीवर धारदार विळ्याने मानेवर, हातावर तसेच खांद्यावर वर्मी घाव घातल्याने चित्रांजलीचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी भिमाप्पा चितारी याने पळ काढला आणि तो उसात लपून बसला. दरम्यान या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिस पाटील परशुराम सरनाईक यांच्याकरवी पोलिसांना दिली. पोलिस पाटील सरनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी भिमाप्पा चितारी याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
Source link



