Kalmmawadi Dam | काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद! कोल्हापूर आणि कर्नाटकातील ‘या’ गावांवर मोठे संकट

सरवडे ( विजय पाटील, ) –मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकातील अनेक गावांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या धरणातून पाण्याचा बिसर्ग सध्या पूर्णतः बंद करण्यात आला आहे. पर्यायाने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने घटली असून शेतकऱ्यांकडून केलाजाणारा पाणी उपसाही थांबवला आहे. याचा थेट परिणाम दूधगंगा नदीकाठी आणि डाबा, उजबा कालवा काठच्या पिकांवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावर्षी १७ जून आला तरी मान्सून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे धरणातील पाणी साठा खालावला आहे. धरणात २५ टीएमसी पाणीसाठा केला जातो. सध्या फक्त २.२३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये१.४३ टीएमसी मृतसाठा आहे. पावसाने दिलेली ओढ आणि चिंताजनक पाणी पातळी याचे गांभीर्य घेत प्रशासनाने उपसा बंदी घातली आहे.धरणातून पाणी सोडणे थांबल्यामुळे नदी आणि कालवा पात्र कोरडे पडू लागले आहे.
अनेक शेतकरी नदीपात्रातून मोटार पंपाच्या साहाय्याने शेतीसाठी पाणी उपसा करत होते. मात्र, सध्या पाणी कमी असल्याने व उपसा बंदी आदेश आल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. विशेषतः ऊस, भाजीपाला व इतर नगदी पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. जूनचा मध्यावधी आला तरी मान्सून आगमन झालेले नाही. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक महिने कष्ट घेऊन जोपासलेले पिक पाण्याअभावी कोमेजून जाणार यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Source link



