Maharashtra Police दुरावलेली मुले त्यांच्या कुटूंबात परतली…महाराष्ट्र पोलिसांच्या ऑपरेशन शोध -४ मोहिमेला यश

महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध-४ या विशेष मोहिमेअंतर्गत हरवलेली, बेपत्ता झालेली तसेच विविध कारणांनी घरापासून दूर गेलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेदरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी कामगिरी करत वसतिगृहातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.
संबंधित दोन्ही मुले काही कारणास्तव वसतिगृहातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलांच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी तत्काळ शोध मोहीम हाती घेतली. परिसरातील विविध ठिकाणी चौकशी, तांत्रिक माहितीचे विश्लेषण तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य राबविण्यात आले.
मुलांना पालकांच्या ताब्यात दिले
अखंड प्रयत्नांनंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचा शोध लावून त्यांची समुपदेशनपूर्वक विचारपूस केली. त्यानंतर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आपल्या मुलांना सुखरूप परत मिळाल्याने पालकांनी भावूक होत शिवाजीनगर पोलिसांचे आभार व्यक्त केले.
ऑपरेशन शोध-४ ही मोहीम केवळ हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यापुरती मर्यादित नसून त्यांचे पुनर्वसन, समुपदेशन आणि कुटुंबाशी पुनर्मीलन घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्यदेखील करत आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात कोणतेही मूल संशयास्पद परिस्थितीत आढळल्यास अथवा हरवलेल्या मुलांबाबत कोणतीही माहिती असल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सहकार्यामुळे अशा मुलांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
Source link



