भारताच्या फिरकीसमोर पाक महिलांची शरणागती

महिला टी-20 विश्वचषक : पाक महिलांचा 64 धावांनी दारूण पराभव, मानधनाचे अर्धशतक, दीप्ती शर्माचे 5, श्रीचरणीचे 3 बळी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर पाक संघाने सपशेल शरणागती पत्करली. 2026 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकचा 64 धावांनी दणदणीत पराभव करत दणकेबाज विजयी सलामी दिली. फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने केवळ 10 धावात 5 गडी बाद करून सामनावीराचा बहुमान पटकाविला. तसेच स्मृती मानधनाचे अर्धशतक भारताच्या विजयाला हातभार लावणारे ठरले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पहिल्या षटकातील 5 व्या चेंडूवर सादिया इक्बालने शेफाली वर्माला 6 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर तस्मिया रूबाबने रॉड्रीग्सला केवळ एका धावेवर तंबूचा रस्ता दाखविला. स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रित कौर या जोडीने संघाची बाजू सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी 63 चेंडूत नोंदविली.
मानधनाने 44 चेंडूत 2 षटकार, 9 चौकारांसह 68 धावा जमविल्या. शमीमने तिला झेलबाद केले. यानंतर सादिया इक्बालने भारती फुलमालीला एका धावेवर बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 35 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा झळकविल्या. फातिमा सनाने तिला परवेझकरवी झेलबाद केले. भारताची स्थिती यावेळी 16.2 षटकात 5 बाद 123 अशी होती. रिचा घोषने शेवटच्या दोन षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला 170 धावापर्यंत मजल मारता आली. रिचा घोषने 17 चेंडूत 1 षटकार व 5 चौकारांसह 34 धावा झोडपल्या. तिने 19 व्या षटकात 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 धावा झोडपल्या. रिचा शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्रिफळाचित झाली. दीप्ती शर्माने 9 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12, तर श्रेयांका पाटीलने नाबाद 1 धाव केली. भारताच्या डावामध्ये 4 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारताने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 38 धावा जमविताना 2 गडी गमविले. भारताचे अर्धशतक 51 चेंडूत, शतक 77 चेंडूत तर दीडशतक 114 चेंडूत नोंदविले गेले. मानधनाने 34 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. पाकतर्फे सादिया इक्बाल आणि फातिमा सना यानी प्रत्येकी दोन तर शमीम आणि रूबाब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्त्युतरादाखल खेळताना मुनीबा अली आणि फिरोझा यानी पाकच्या डावाला सावध सुरूवात करून देताना 29 चेंडूत 38 धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्माने फिरोझाला फुलमालीकरवी झेलबाद केले. तिने 9 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा केल्या. त्यानंतर दीप्ती शर्माने पाकला आणखी एक धक्का देताना आयेशा जाफरला मानधनाकडे झेल देण्यास भाग पाडले. मानधनाने हा झेल अप्रतिमरित्या घेतला. जाफरने 8 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा केल्या. श्रीचरणीने जबीनला 2 धावावर झेलबाद केले. एका बाजूने चिवट फलंदाजी करणारी मुनीबा अली दीप्ती शर्माच्या अचूक फेकीवर धावचीत झाली. तिने 35 चेंडूत 5 चौकारांसह 41 धावा जमविल्या. शेफाली वर्माने कर्णधार फातिमा सनाला खाते उघडण्यापूर्वीच मानधनाकरवी झेलबाद केले. पाकची यावेळी स्थिती 5 बाद 77 अशी होती.
श्रीचरणीने नतालीया परवेझला 7 धावावर झेलबाद केले. भारतीय संघातील हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत चपळ झाले. कौरने तीन झेल तर मानधनाने दोन झेल टिपले.
शर्माच्या एका षटकात 3 बळी
पाकच्या डावातील 17 वे षटक निर्णायक ठरले. दीप्ती शर्माचे चौथे षटक होते. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दीप्तीने आलिया रियाजला झेलबाद केले. तिने 17 चेंडूत 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. दीप्तीने या षटकातील चौथ्या चेंडूवर रूबाबला खाते उघडण्यापूर्वीच रॉड्रीग्सकरवी झेलबाद केले. तर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर दीप्तीने नशरा संधूला झेलबाद करून पाकचा डाव 17 षटकात 106 धावांत संपुष्टात आणला.
पाकच्या डावामध्ये 10 चौकार नोंदविले गेले. पाकने पहिल्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमविला. पाकचे अर्धशतक 35 चेंडूत तर शतक 95 चेंडूत नोंदविले गेले. भारतातर्फे दीप्ती शर्माने 10 धावात 5 बळी तर श्रीचरणीने 21 धावात 3 बळी आणि शेफाली वर्माने 22 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 6 बाद 170 (स्मृती मानधना 68, हरमनप्रीत कौर 36, रिचा घोष 34, दीप्ती शर्मा नाबाद 12, अवांतर 11, सादिया इक्बाल आणि फातिमा सना प्रत्येकी 2 बळी, तस्मिया रूबाब आणि रमीन शमीम प्रत्येकी 1 बळी), पाकिस्तान 17 षटकात सर्वबाद 106 (मुनीबा अली 41, फिरोझा 12, आयेशा जाफर 12, आलिया रियाज 18, अवांतर 5, दीप्ती शर्मा 5-10, श्रीचरणी 3-21, शेफाली वर्मा 1-22)
Source link



