भारतीय लष्कराच्या गणवेशात बदल

गुलामगिरीच्या काळातील चिन्हे हटवली : टॅटू, मिशा, केसांबाबत नियम अधिक कडक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लष्कराने वसाहतकालीन परंपरा दूर करण्यासाठी आपल्या गणवेश संहितेत सुधारणा केली आहे. औपचारिक प्रसंगी बंद गळ्याचे ‘बंदी’ जॅकेट घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच समारंभीय पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आला असून संचलनादरम्यान पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तलवार बाळगणे ऐच्छिक करण्यात आले आहे. गणवेशाव्यतिरिक्त नियमांमध्ये कर्मचाऱ्यांचे दिसणे आणि नीटनेटकेपणा यासंबंधी विविध मानकांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने टॅटू आणि बॉडी पियर्सिंगपासून ते केशभूषा, मिशा आणि सौंदर्यप्रसाधनांच्या वापरापर्यंतच्या बाबींचा समावेश आहे.
भारतीय लष्कराने आपल्या सैनिकांच्या गणवेशातून गुलामगिरीच्या काळातील चिन्हे हटवली आहेत. नवीन बदल भारताची सार्वभौम ओळख आणि राष्ट्रीय भावनेला अनुसरून आहेत. हे बदल ‘आर्मी युनिफॉर्म्स-2026’ नावाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 174 पानांच्या नियमावलीत सविस्तरपणे दिले आहेत. नवीन नियमांनुसार, ‘रॉयल’ सारख्या जुन्या शब्दांचा वापरही बंद करण्यात आला आहे. पहिल्यांदाच, स्वदेशी बनावटीच्या ‘बंदी’ जॅकेटचा औपचारिक नागरी पोशाखात समावेश करण्यात आला आहे. बंद गळ्याचे ‘बंदी’ जॅकेट पूर्ण बाह्यांचा शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स आणि बंद बुटांसोबत घालता येईल. लष्कराने यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये अनेक जुन्या परंपरा रद्द केल्या होत्या. त्यात समारंभांसाठी घोडागाड्यांचा वापर, सेवानिवृत्तीच्या वेळी होणारे ‘पुल-आउट’ कार्यक्रम आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी पाईप बँडची परंपरा यांचा समावेश होता.
तलवारींच्या वापरावरही मर्यादा
नवीन नियमांनुसार, केवळ परेड कमांडर, तुकडी कमांडर आणि काही विशिष्ट नियुक्त अधिकारीच तलवार बाळगू शकतील. तिचा वापर केवळ प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, सैन्य दिन यांसारख्या प्रमुख समारंभांमध्ये आणि मानवंदना देतानाच केला जाईल. परेडचे निरीक्षण करणारे अधिकारी परेड दरम्यान तलवार बाळगणार नाहीत, असे नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. हे बदल परंपरा नष्ट करण्याच्या उद्देशाने केलेले नाहीत, तर गुलामगिरीच्या काळातील अवशेषांना आधुनिक भारतीय विचारांशी जुळवून घेण्यासाठी आहेत, असे लष्कराने म्हटले आहे.
परवानगीशिवाय लग्न, पार्टी आणि निदर्शनांमध्ये गणवेश घालण्यास बंदी
या नियमावलीत वैयक्तिक देखावा, लष्करी वर्तन आणि गणवेशातील आचरणाबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे देखील दिली आहेत. यानुसार, सैनिकांना परवानगीशिवाय दाढी, विचित्र केशभूषा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, टॅटू, बॉडी पियर्सिंग आणि मेकअप करण्यास मनाई असेल. याव्यतिरिक्त अधिकारी आणि सैनिकांना परवानगीशिवाय राजकीय, धार्मिक किंवा निषेध सभा, लग्न, खासगी पार्ट्या आणि पैसे देऊन आयोजित केलेल्या मीडिया कार्यक्रमांमध्ये गणवेश घालण्याची परवानगी दिली जाणार नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही सौंदर्यप्रसाधनांसंबंधीच्या कडक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. लिपस्टिक, रंगीत नेलपॉलिश, टिकली आणि नाकात पिन लावण्यास मनाई आहे. सिंदूर लावता येईल, परंतु बेरेट किंवा टोपी घातल्यावर तो दिसला पाहिजे, असे नियमांमध्ये नमूद आहे.
Source link



