Uncategorized

तिघा सख्ख्या भावांसह चौघे बुडाले

मेटवाडा-कुळे येथे दूधसागर नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील तिघा भावांसह एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक व तेवढीच हृदयद्रावक घटना काल शनिवारी सकाळी घडली. सर्वजण वास्को येथील रहिवासी असून मृतांमध्ये दोघे सख्खे जुळे भाऊ, त्यांचा मोठा भाऊ आणि एका मित्राचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे दूधसागर नदीवर सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. त्यांच्यासोबत आलेला एक मित्र पोहता येत नसल्याने आणि पाण्यात न उतरल्याने सुदैवाने बचावला.

त. भा. प्रतिनिधी

धारबांदोडा : या घटनेची माहिती विविध माध्यमांतून सर्वत्र पसरल्यानंतर संपूर्ण गोवाच हादरला आहे. मयतामध्ये रामण्णा परसू मदार (वय 19 वर्षे), लक्ष्मण परसू मदार (19 वर्षे), हिरण्णा परसू मदार (21 वर्षे) हे तिघे सख्खे भाऊ असून विजय सागिली (21 वर्षे) या त्यांच्यासोबत गेलेल्या मित्राचाही बुडून मृत्यू झाला आहे.  त्यांच्यासोबत सहलीला गेलेला राहुल हरिजन हा पाण्यात न उतरल्याने सुदैवाने बचावला. त्यानेच या घटनेची सविस्तर माहिती पोलिस व प्रसार माध्यमांना दिली. मयत रामण्णा व लक्ष्मण हे दोघेही जुळे भाऊ बोगदा वास्को येथील आयटीआयचे प्रशिक्षण घेत होते तर हिरण्णा हा त्यांचा मोठा भाऊ खासगी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. या घटनेतील चौथा मृत युवक विजय सागिली हा जुवारीनगर येथील कॉलेजमध्ये बीबीएच्या तिसऱ्या वर्षांत शिकत होता. मदार कुटुंबीय मूळ विजापूर कर्नाटक येथील असून गेल्या बऱ्याच वर्षांपासून नवेवाडे वास्को येथील संतोषी माता मंदिरजवळ स्थायिक झाले आहेत.

पोहता येत नसल्याने पाचवा मित्र बचावला

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदार कुटुंबातील वरील तिघेही भाऊ तसेच त्यांचे दोन मित्र विजय व राहुल हे पाचजण शनिवारी सकाळी वास्को येथून  ट्रेन पकडून कुळे रेल्वे स्थानकावर उतरले होते. शनिवारी सुट्टी असल्याने त्यांनी पिकनिकचा बेत आखला होता. कुळे स्टेशनवर उतरल्यानंतर एका वाहनाची लिफ्ट घेऊन मेटवाडा येथील पुलाजवळ ते पोचले. तेथून पायी चालत मेटवाडा येथील पुलाजवळ नदीचे पात्र त्यांनी गाठले. नदीत उतरण्यापूर्वी त्यांनी पाण्याच्या खोलीचा अंदाज घेतला होता. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राहुल याने नदी पात्राच्या खोलीचा अंदाज घेऊन याठिकाणी पाण्यात न उतरण्याचा सल्ला या चौघांना दिला होता. त्याचे ऐकून माघारी फिरण्याचा त्यांचा बेतही झाला होता. पण त्यापैकी तिघा जणांनी याच ठिकाणी पाण्यात पोहण्यासाठी उतरण्याचा हट्ट धरल्याने तिघेही भाऊ व विजय हा त्यांचा मित्र पाण्यात उतरले. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर सुरुवातीला पाणी कमी असल्याचे जाणवल्याने ते जरा पुढे सरकले. मात्र पुढे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सुरुवातीला एक जण बुडाला. त्याला पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून इतर तिघेजण मदतीला धावले व एका पाठोपाठ सर्व चारही जण पाण्यात बुडून बेपत्ता झाले. सदर घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. डोळ्यांदेखत पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी राहुल याने जवळ असलेली लाकडाची काठी त्यांच्या दिशेने देण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्यापर्यंत ही काठी पोचलीच नाही. त्यानंतर राहुल याने पुलापर्यंत धाव घेऊन एका दुचाकीचालकाच्या मदतीने कुळे पोलिसस्थानक गाठले व घटनेची माहिती पोलिसांना दिली. कुळे पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बुडालेल्या चारही जणांचा पाण्यात शोध घेतला. त्यापैकी एकाला पोलिसांनी तर इतर तिघांचे मृतदेह तेथील जीवरक्षकांनी पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी पंचनामा करून व घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या राहुल याची जबानी घेतल्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मडगाव येथील हॉस्पिसियोमध्ये पाठवण्यात आले. उपनिरीक्षक राहुल नाईक यांनी घटनास्थळी पंचनामा केला. निरीक्षक सगुण कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

एकाचवेळी चारजण बुडाल्याची पहिलीच घटना

कुळे येथील दूधसागर नदीच्या पात्रात यापूर्वीही सहलीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झालेला आहे. पण एकाचवेळी चारजण बुडाल्याची ही पहिलीच घटना आहे. पाच वर्षांपूर्वी कुळे पोलिसस्थानकाच्या मागे असलेल्या नदीच्या पात्रात तिघा लहान मुलांचा अशाच प्रकारे बुडून मृत्यू झाला होता. मात्र ही मुले कपडे धुण्यासाठी आपल्या नातेवाईकांसोबत नदीवर आली होती.  पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. मदार कुटुंबातील सर्व तिघाही मुलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​