Uncategorized

अखेर खुनाला वाचा फुटलीच!

माजी सैनिक पतीचा खून करणाऱ्या पत्नी अन् प्रियकराला केले गजाआड 

     त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : विम्याची रक्कम मिळवण्यासाठी सलाईनमध्ये विष घालून पतीचा काटा काढणाऱ्या घोडगेरी, ता. हुक्केरी येथील महिलेसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून काही सरकारी अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

तीन महिन्यांपूर्वी निवृत्त सैनिक संदीप मंजरगी (वय 46) राहणार घोडगेरी याचा विष प्रयोगाने खून करण्यात आला होता. अपघाती मृत्यू भासवून त्याच्यावर अंत्यक्रियाही करण्यात आली होती. शेवटी या प्रकरणाचा उलगडा झाला असून यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीपची पत्नी सुमा व तिचा प्रियकर पुंडलिक डोंबर दोघेही राहणार घोडगेरी यांना अटक केली आहे.

या दोघा जणांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. अटक होण्याआधीच पुंडलिकने 3 मिनिटे 22 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला आहे. खून झालेला संदीप व आपले संबंध काय होते, त्याच्या पत्नीबरोबरची मैत्री कशी होती? पतीचा काटा काढण्यासाठी सुमाने विष कसे मागवले? याची माहिती देताना संपूर्ण चौकशीची त्याने मागणी केली आहे.

संदीपचा मृतदेह उकरून काढून वैज्ञानिक पृथक्करणासाठी तो प्रयोगशाळेला पाठवून देण्यात आला आहे. यापूर्वी पोस्टमॉर्टेम झाले होते तर त्याच्यावर विषप्रयोगाची माहिती अहवालात का आली नाही? याची चौकशी करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली असून शुक्रवारी रात्री काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये पोलीस दलातील क्लार्क व प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

उपलब्ध माहितीनुसार हुक्केरीच्या जत्रेहून परतताना किरकोळ अपघातात जखमी झालेल्या संदीपला घटप्रभा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याचा मृत्यू झाला तर विम्याची मोठी रक्कम आपल्याला मिळते म्हणून सुमाने आपल्या प्रियकरालाही विश्वासात घेतले होते. संदीपचा मृत्यू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप विम्याची रक्कम आली नाही. मात्र, पुंडलिक व सुमा यांच्यात मतभेद निर्माण झाले. कोणाची वाटणी किती? यावरून निर्माण झालेल्या मतभेदामुळे खून प्रकरणाचा वाचा फुटली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​