अफगाणचा अर्धा संघ बाद

टीम इंडियाच्या 8 बाद 564 धावा : अफगाण संघाची खराब सुरुवात : पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचे 3 बळी
वृत्तसंस्था/ मुल्लनपूर
येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपला पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केला. यानंतर पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या भेदक माऱ्यासमोर अफगाणिस्तानची अर्धा संघ बाद झाला असून दुसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 39.5 षटकांत 5 बाद 113 धावा केल्या होत्या. रहमत शाह 43 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावाच्या आधारावर भारताने 451 धावांची आघाडी घेतली आहे.
भारताने दुसऱ्या दिवशी 3 बाद 368 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी कर्णधार शुभमन गिल शतक करून, तर रिषभ पंत अर्धशतक करून नाबाद होते. या दोघांनी सुरुवात केली, पण गिलला सलीम साफीने 126 धावांवर बाद केले. त्यानंतर ध्रुव जुरेललाही 19 धावांवर त्रिफळाचीत केले. यानंतर ऋषभ पंतने शानदार खेळी साकारताना 121 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारासह 81 धावांची खेळी साकारली. शतकापासून मात्र तो वंचित राहिला.
वॉशिंग्टन सुंदरचे नाबाद अर्धशतक
पंत बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आधी मानव सुतारला आणि मग मोहम्मद सिराजला सोबत घेत संघाला सावरले. मानव 28 धावांवर बाद झाला, तर सिराज 12 चेंडू 22 धावांची आक्रमक खेळी करून बाद झाला. तरी सुंदरने अर्धशतक केले. त्याने 68 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 52 धावांचे योगदान दिले. सुंदरचे अर्धशतक झाल्यानंतर गिलने भारताचा पहिला डाव 8 बाद 564 धावांवर घोषित केला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद सलीम साफीने सहा बळी घेतले. झियाउर रहमान आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पदार्पणातच मानव सुथारचा धमाका
अफगाणिस्तानच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. पदार्पण करणाऱ्या मानव सुथारच्या गोलंदाजीवर सलामीवीर अब्दुल मलिक अवघ्या 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने एका अप्रतिम चेंडूवर सेदिकल्लाह अटलला 17 धावांवर बाद केले. यानंतर मानवने रहमानुल्ला गुरबाजला 12 धावांवर बाद करून अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकलले. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. प्रसिद्ध कृष्णाने शाहिदीला 20 धावांवर बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी, मानव सुथारने आसिफ झाझाईला 3 धावांवर बाद करून भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. एकीकडे, विकेट जात असताना मात्र रहमत शाहने 81 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 43 धावा फटकावल्या. यामुळे अफगाण संघाला शंभरी गाठता आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफगाण संघाने 39.5 षटकांत 5 बाद 113 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारत पहिला डाव 127 षटकांत 8 बाद 564 घोषित (यशस्वी जैस्वाल 24, केएल राहुल 100, साई सुदर्शन 81, शुभमन गिल 177 चेंडूत 126, ऋषभ पंत 121 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारासह 81, ध्रुव जुरेल 19, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 52, मानव सुथार 28, सिराज 22, कुलदीप यादव नाबाद 9, मोहम्मद सलीम 140 धावांत 6 बळी, शाहिदी आणि रेहमान प्रत्येकी 1 बळी)
अफगाणिस्तान पहिला डाव 39.5 षटकांत 5 बाद 113 (अब्दुल मलिक 16, सेदिकल्लाह अटल 17, रेहमानउल्लाह गुरबाज 12, रहमत शाह नाबाद 43, हशमतउल्लाह शाहिदी 20, मानव सुथार 21 धावांत 3 बळी, प्रसिद्ध कृष्णा 2 बळी).
-भारताची सामन्यावर पकड
-पहिल्याच कसोटीत मानव सुथारची डावखुरी फिरकी ठरली प्रभाव
-अफगाण संघ 451 धावांनी पिछाडीवर
-फॉलोऑन टाळण्यासाठी एकूण 364 धावा काढण्याची गरज
Source link


