Uncategorized
Karad News: कराड तालुक्यात ऊस लागण पडणार लांबणीवर

८६०३२ वाणाला शेतकऱ्यांची जादा पसंती, कांड्याऐवजी रोपे लागणीकडे कल
BY- उमेश पाटील
मसूर : मे महिन्यात अवकाळी पावसाने कराड तालुक्यात अनेक ठिकाणी हजेरी न लावल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. खरीप हंगामातील पेरणीला अद्याप वेळ असला तरी सध्या तालुक्यात ठीकठिकाणी ऊस लागणीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या मशागती रेंगाळल्याने यंदा ऊस लागण लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अलीकडे ऊसाची लागण करताना कांड्याऐवजी ऊसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून त्यासाठी तालुक्यातील सर्वच रोपवाटिका सज्ज झाल्या आहेत. ऊस रोपांची मागणी अनेक शेतकऱ्यांनी नोंदवली असली तर लागणीसाठी शेतकरी थांबलेला दिसून येत आहे. ऊसाचे विविध प्रकारचे वाण असले तरी कराड तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या ऊसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देतात.
मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात न झाल्याने खरीप हंगामातील पेरणीही लांबणीवर पडणार आहे. तसेच मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर किंवा कराड तालुक्याच्या दक्षिण भागात सात जून नंतर धूळवाफ पेरणी केली जाते. पेरणीसाठी लागणारे बी बियाणे जमा करण्यात सध्या शेतकरी मग्न आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची स्वतःचे पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी ऊस लागणीस प्रारंभ केला आहे. पूर्वीपासूनच ऊसाची लागण ऊसाची कांडी शेतात पुरून करण्याची पद्धत चालत आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ऊसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यातच यंदा पाऊस काळ कमी असल्याने आडसाली ऊसाची वाढ योग्य त्या प्रमाणात झालेली नाही त्यामुळे ऊस लागणीसाठी ऊसाचा तुटवडा यंदा जाणवणार आहे.
परिसरात ऊस रोपवाटिका आहेत. त्या रोपवाटीकेमध्ये ऊसाची रोपे लावण्यासाठी सज्ज झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागणीसाठी ऊसाच्या रोपांचे बुकींग रोपवाटीकेत केले आहे. तालुक्यात रोपे लागणीकडे शेतकऱ्यांचा कल असला तरी ४० टक्के शेतकरी ऊसाची कांडी लागण करत असतात. शेतीच्या कामासाठी मजुरांचा तुटवडा भासत असल्याने पैरा पद्धतीने एकमेकांच्या ऊस लागणी करतात. शेतीची मशागत पूर्ण करून सरी सोडून शेत तयार करून घेतले असल्याचे दिसत आहे.
रोप जगवण्यासाठी कसरत
यावर्षी मे महिन्यात दमदार मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे रेंगाळली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मशागती रखडल्याने ऊस लागण ही रखडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपांचे बुकींग केले असले तरी पावसाची वाट बघत शेतकरी थांबले आहेत. रोपवाटीकेत मोठ्या प्रमाणात ऊसाची रोपे तयार असून ऐन कडाक्याच्या उन्हात रोपांना जगवण्यासाठी सध्या कसरत करावी लागत आहे.
— शेखर पाटील, रोपवाटिका संचालक
Source link



