Cash worth 2.24 crore seized from TMC leader’s farm.

चार ट्रॉली बॅगमध्ये ठेवली होती रक्कम, : ममतांच्या ‘कमिशन राज’चा भंडाफोड
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगाल पोलिसांनी गुरुवारी भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या कारवाईत कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त केली. उत्तर 24 परगणा जिह्यातील बदुरिया नगरपालिकेचे अध्यक्ष आणि टीएमसी नेते दिपांकर भट्टाचार्य यांच्या शेतातून कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून चार ट्रॉली बॅग आणि एक पोते जप्त केले. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली टीएमसी नेत्याला गेल्या सोमवारी एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्यानंतर आता ही रोकड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या या कारवाईच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीत झालेल्या ‘कमिशन राज’चा भंडाफोड झाला आहे.
बदुरिया येथील एका हॉटेलमधून दिपांकर भट्टाचार्य यांना सोमवारी अटक करण्यात आली. अटकेवेळी त्यांच्याकडून 80 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एकूण रोकडची रक्कम 3.04 कोटी रुपये झाली आहे. अटकेनंतर मंगळवारी दिपांकर भट्टाचार्य यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीतील चौकशीदरम्यान त्यांनी उघड केलेल्या माहितीच्या आधारे आता आणखी कोट्यावधींची रोकड जप्त केली आहे.
बदुरिया नगरपालिकेचे अध्यक्ष दिपांकर भट्टाचार्य यांच्यावर राज्य सरकारच्या विविध प्रकल्पांमधून निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आणि कोठडीत चौकशी केल्यावर पश्चिम बंगाल पोलिसांनी गावप्रमुखाच्या निवासस्थानामागील तागाच्या शेतातून मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त केले. ट्रॉली बॅग आणि पोत्यांमधून जप्त केलेली रोकड बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनेक वेळा मोजण्यात आली. जप्त करण्यात आलेली एकूण रक्कम 2.24 कोटी रुपये होती, असे राज्य पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बदुरिया नगरपालिकेच्या अध्यक्षांविरुद्ध पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एक तक्रार माकपने तर दुसरी पश्चिम बंगाल भाजपने दाखल केली होती. या तक्रारींच्या आधारे, दिपांकर यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. टीएमसी नेत्याच्या अटकेनंतर दिपांकर यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सध्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे दोन आरोप आहेत. ‘बांग्लार बारी’ योजनेअंतर्गत घरांच्या वाटपात कमिशन स्वीकारल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. तसेच बदुरियातील स्थानिक रहिवाशांकडून, विशेषत: व्यापाऱ्यांकडून कथितपणे पैसे उकळल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. या आरोपांची सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.
Source link



