आरसीबी-गुजरात पहिला क्वालिफायर सामना

आरसीबीचा 55 धावांनी पराभव : जिंकूनही हैदराबाद एलिमिनेटरमध्ये खेळणार, इशान किशन सामनावीर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीवर 55 धावांनी विजय मिळवला. हैदराबादने हा सामना जरी जिंकला असला तरी ते आयपीएल क्वालिफायर 1 साठी पात्र ठरू शकले नाहीत. यामुळे आरसीबी आणि गुजरात यांच्यात पहिला क्वालिफायर सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. विजयानंतरही हैदराबादला आता एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 255 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 4 बाद 200 धावापर्यंत मजल मारता आली.
हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाची सुरुवात करुन देताना 45 धावांची भागीदारी केली. हेडला 26 धावांवर रसीख सलामने बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. यानंतर अभिषेक आणि इशान किशनने हैदराबादचा डाव सावरला. अभिषेकने 22 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 56 धावांची खेळी साकारली. अर्धशतकानंतर अभिषेक लगेच बाद झाला.
क्लासेन, इशानची फटकेबाजी
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. या दोघांनीही 113 धावांची भागीदारी करत संघाचे द्विशतक फलकावर लावले. इशानने अर्धशतक झळकावताना 46 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारासह 79 धावा करत अखेरच्या चेंडूवर बाद झाला तर क्लासेनने 24 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. क्लासेन बाद झाल्यानंतर नितीश कुमार रे•ाrने 12 चेंडूत नाबाद 29 धावा फटकावल्या. इशान किशन, अभिषेक शर्मा, क्लासेन यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 255 धावा करत यंदाच्या आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभी केली.
आरसीबीला पराभवाचा धक्का
आरसीबीला हा सामना जिंकण्यासाठी 256 धावांचे टार्गेट मिळाले होते. तर गुणतालिकेत अव्वल स्थानी राहण्यासाठी आणि नेट रनरेटसाठी 166 धावा करायच्या होत्या. या सामन्यात विराट कोहली आणि वेंकटेश अय्यरची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. अय्यरने अवघ्या 19 चेंडूत 44 धावांची वादळी खेळी करुन दमदार सुरुवात करुन दिली. विराट कोहली अवघ्या 15 धावांवर माघारी परतला. तर देवदत्त पडिक्कलने 21 धावांचे योगदान दिले. शेवटी रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या यांनी मिळून आरसीबीचा डाव सांभाळला पण हे दोघे संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीला 20 षटकांत 4 बाद 200 धावापर्यंतच मजल मारता आली. दुसरीकडे, 166 धावांचा पल्ला गाठताच आरसीबीने गुणतालिकेतील नंबर 1 स्थानावर शिक्कामोर्तब केला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 4 बाद 255 (अभिषेक शर्मा 56, ट्रॅव्हिस हेड 26, इशान किशन 79, क्लासेन 51, नितीश कुमार रे•ाr नाबाद 29, सलाम 2 बळी, सुयश शर्मा आणि कृणाल पांड्या प्रत्येकी 1 बळी)
आरसीबी 20 षटकांत 4 बाद 200 (वेंकटेश अय्यर 44, विराट कोहली 15, पडिक्कल 21, रजत पाटीदार 56, कृणाल पांड्या नाबाद 41, टीम डेव्हिड नाबाद 15, इशान मलिंगा 2 बळी, साकिब हुसेन आणि ट्रॅव्हिस हेड प्रत्येकी 1 बळी).
क्लासेनने ओलांडला सहाशे धावांचा टप्पा
हेनरिक क्लासेनने अर्धशतकी खेळीदरम्यान आयपीएल 2026 मध्ये 600 धावांचा टप्पा गाठला आहे. क्लासेन हा आयपीएलच्या 19 वर्षांच्या इतिहासात एका सीझनमध्ये 600 धावा करणारा मधल्या फळीतील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम मधल्या फळीतील कोणताच फलंदाज करू शकला नव्हता. टी-20 मालिकेत किंवा स्पर्धेतही चौथ्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजी करत 600 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला.
-विराट कोहलीने सर्वाधिक 281 सामने खेळत रोहित शर्माचा 280 सामन्यांचा विक्रम मागे टाकला
-पुरुषांच्या फ्रँचायझी टी-20 लीगमध्ये हातात 6 गडी असताना 50 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत होणारा आरसीबी हा पहिला संघ बनला आहे.
-क्वालिफायर 1 सामना 26 मे रोजी धरमशाला येथे तर एलिमिनेटर लढत 27 मे रोजी न्यू चंदिगड येथे खेळविला जाईल.
Source link



