जगातील सर्वात मोठे स्नॅक स्टोअर

चिप्स, चॉकलेट आणि नूडल्सनी भरलेले दुकान
तुम्ही कधी अशा ठिकाणाची कल्पना केली आहे का, जेथे तुमची नजर जेथे कुठे जाईल, तेथे केवळ आणि केवळ चिप्सची पाकिटं, चॉकलेटच्या पर्वतासारख्या भिंती आणि नूडल्सचे हजारो पर्यायच दिसून येतील. जर तुम्ही खाण्यापिण्याचे शौकीन असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे. जगातील सर्वात मोठे स्नॅक स्टोअर चीनमध्ये सुरू झाले आहे. चीनच्या चांग्शा शहरातील हे स्टोअर इतके मोठे आहे की याला ‘स्नॅक किंगडम’ या नावाने ओळखले जाते आणि या दुकानाच्या नावावर गिनिज बुकचा विश्वविक्रमही नोंदविला गेला आहे. चीनचे हे स्नॅक किंगडम सध्या जगभरातील पर्यटक आणि खाण्यापिण्याच्या शौकिनांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
चीनमधील सर्वात मोठी स्नॅक रिटेल चेन ‘मिंगमिंग हेनमांग’कडून तयार करण्यात आलेल्या या स्टोअरचे क्षेत्रफळ 12 हजार चौरसमीटरपेक्षाही अधिक आहे. 17 एप्रिल रोजी याच्या उद्घाटनासोबतच याचे नाव ‘जगातील सर्वात मोठे स्नॅक स्टोअर’ म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेंद झाले आहे. या स्टोअरचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे येथे मिळणारी विविधता आहे. येथे जगभरातील 70 देशांमधून आलेले 35 हजारांहून अधिक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. याचबरोबर स्टोअरमध्ये 6500 हून अधिक जागतिक आणि देशांतर्गत ब्रँडसची उत्पादने एकाच छताखाली मिळतात. या स्टोअरच्या आत शिरताच प्रवेशद्वारावर काचेच्या कॅबिनेटद्वारे निर्मित एक लांब कॉरिडॉर दिसतो, जेथे रंगबिरंगी स्नॅस सजविण्यात आले आहेत.
नूडल सिटी
या स्टोअरच्या आत अनेक खास सेक्शन निर्माण करण्यात आले आहेत. येथील ‘इन्स्टंट नूडल सिटी’ सर्वात लोकप्रिय आहे. तेथे नूडल्सचे 3500 हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. यात स्थानिक स्वादापासून जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले असे नूडल्स देखील सामील आहेत, ज्याविषयी बहुतांश लोकांनी कधीच ऐकले नसेल. याचबरोबर येथील कोला सेक्शनही अत्यंत मोठा आहे, जेथे 20 देशांचे कोला ब्रँड्स मिळतात. क्लासिक कोलासोबत येथे ‘सॉल्टेड कोला’ (मीठयुक्त कोला) यासारख्या दुर्लभ गोष्टींची चवही येथे चाखता येते.
मोठी गर्दी अन् जायंट स्नॅक्स
स्टोअरची लोकप्रियता इतकी अधिक आहे, की उद्घाटनाच्या केवळ दोन दिवसांनीच व्यवस्थापनाला स्टॉक भरणे आणि सिस्टीमची क्षमता सुधारण्यासाठी अस्थायी स्वरुपात विक्री रोखावी लागली होती. रंजक बाब म्हणजे चांग्शा शहरात आणखी एक अनोखे स्टोअर आहे, जेथे लोकप्रिय स्नॅक्स म्हणजेच ‘ले’ज चिप्स आणि ओरियो बिस्कीटची विशालकाय पाकिटं मिळतात, ज्यांना खरेदी करणे पर्यटकांसाठी एक वेगळाच रोमांच असतो. या दोन्ही स्टोअर्समध्ये दररोज हजारो लोक व्हिजिट करतात आणि खरेदी करतात.
Source link



