रथ यांच्या हत्येप्रकरणी दिल्लीत सीबीआय छापे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रकांत रथ यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने दिल्लीत अनेक ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अनेक ठिकाणी सुरू केलेली शोधमोहीम शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती. हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे असून हत्येमागील कट आणि नेटवर्कचा तपास सुरू आहे. एजन्सीने तपासासाठी 7 सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. चंद्रकांत रथ हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पश्चिम बंगाल पोलीस करत होते, परंतु नंतर राज्य सरकारच्या विनंतीनुसार हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले.
कोलकाताजवळच्या मध्यमग्रामच्या दोहरिया परिसरात 6 मे रोजी चंद्रकांत रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन दिवसांनी ही घटना घडली. पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे. मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य यांना बिहारच्या बक्सरमधून अटक करण्यात आली, तर राज सिंग याला उत्तर प्रदेशच्या बलियामधून ताब्यात घेण्यात आले. या कटात आणि हत्येमध्ये किमान 8 जण सामील असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी घटनेपूर्वी चंद्रकांत रथ यांच्या ठिकाणाची पाहणी केली होती. त्यानंतरच पाठलाग करून नियोजनबद्धपणे हत्या करण्यात आली होती.
Source link



