केकेआरसमोर गुजरातचे सपशेल लोटांगण

केकेआरचा 29 धावांनी विजय : सामनावीर सुनील नरेनचे 2 बळी : फिन अॅलन, रघुवंशीचा धमाकेदार शो
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्सने घरच्या मैदानात गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिला. कोलकातासाठी हा विजय आणखी खास ठरला, कारण ईडन गार्डन्सवरील हा त्यांचा 100 वा सामना होता. केकेआरने 248 धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकात 4 बाद 218 धावाच करता आल्या. कोलकाताचा हा 12 सामन्यांतील पाचवा विजय आहे. या विजयासह त्यांनी प्लेऑफच्या आशा देखील कायम ठेवल्या आहेत.
गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी पाचारण केले. केकेआरच्या टॉप-4 फलंदाजांनी 247 धावांचा डोंगर उभारला. अजिंक्य रहाणे 14 चेंडूत 14 धावा करत स्वस्तात बाद झाला. यानंतर फिन अॅलनने 35 चेंडूत 4 चौकार व 10 षटकारांसह 93 धावांची खेळी केली. फिन व अंगक्रिश रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली. अंगक्रिश रघुवंशीने 44 चेंडूच 4 चौकार व 7 षटकारांसह नाबाद 82 धावांची खेळी केली. पण, दोघांनाही आपले शतक पूर्ण करता आले नाही. अॅलन बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन व रघुवंशीने 52 चेंडूत 108 धावांची भागीदारी साकारत संघाला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. ग्रीनने 28 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 52 धावांचे योगदान दिले. या जोरावर केकेआरने 20 षटकांत 2 बाद 247 धावांचा डोंगर उभा केला.
सलग विजयानंतर गुजरात पराभूत
केकेआरने दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनच्या कोपराला चेंडू लागल्याने तो जखमी झाला. चेंडूचा फटका इतका जबरदस्त होता की साई 24 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे धावांचा वेग मंदावला. निशांत सिंधु फलंदाजीला आला पण 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने जोस बटलरसोबत डाव सांभाळला. पण गिलची विकेट पडली आणि सामन्याचे चित्र पालटले. गिल 49 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. त्यानंतर जोस बटलरही 35 चेंडूत 57 धावांवर बाद झाला. रिटायर्ड हर्ट झालेल्या साई सुदर्शनने पुन्हा फलंदाजीला उतरून 28 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. मात्र त्याला विजय खेचून आणता आला नाही. गुजरात टायटन्सला 4 बाद 218 धावापर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
केकेआर 20 षटकांत 2 बाद 247 (अजिंक्य रहाणे 14, फिन अॅलन 35 चेंडूत 93, रघुवंशी 44 चेंडूत नाबाद 82, कॅमरुन ग्रीन 28 चेंडूत नाबाद 52, साई किशोर आणि मोहम्मद सिराज प्रत्येकी 1 बळी)
गुजरात टायटन्स 20 षटकांत 4 बाद 218 (साई सुदर्शन नाबाद 53, शुभमन गिल 85, जोस बटलर 57, तेवतिया 2, सुनील नरेन 2 बळी, सौरभ दुबे, ग्रीन प्रत्येकी एक बळी).
Source link



