पोलीस निरीक्षकांकडून माणुसकीचे दर्शन

मोदग्यातील एकाकी वृद्धाला दिला मदतीचा हात : बंद पडलेली पेन्शन सुरू करून दिला दिलासा
बेळगाव : एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने मनात आणले तर चाकोरीबाहेरील सेवाकार्यही करता येते. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी मोदगा, ता. हुक्केरी येथील एका वृद्धाचे पाच वर्षांपूर्वी बंद झालेले वृद्धापवेतन सुरू करून दिले आहे. खरे तर आधारकार्ड, रेशनकार्ड, पेन्शन ही कामे पोलीस दलाच्या अखत्यारित येत नाहीत. अलीकडे राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात राहणाऱ्या एकाकी वृद्धांची भेट घेऊन त्यांची सुरक्षितता व खुशालीची खात्री करून घेण्याची सूचना केली आहे. यासाठी संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मोदगा परिसरात बीटचे कर्तव्य बजावणाऱ्या बी. एस. कपरट्टी यांच्या निदर्शनास गावातील एका वृद्धाची अवस्था आली.
त्यांनी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांना माहिती दिली. जावेद यांनी मोदग्याला भेट देऊन पुंडलिक जोत्याप्पा लोहार (वय 80) या एकाकी वृद्धाची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुंडलिक यांना चार मुले आहेत. काही वर्षांपूर्वी आजाराने एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तीन मुलींची लग्ने झाली. त्यामुळे त्या सासरी राहतात. सरकारकडून मिळणारे वृद्धाप वेतन पाच वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे आपण आर्थिक संकटात असल्याची माहिती या वृद्धाने पोलीस निरीक्षकांना दिली. जावेद मुशापुरी यांनी हुक्केरीच्या तहसीलदारांना पत्र पाठवून त्यांच्या व्यथा कळविल्या. आधारकार्ड अपडेट न झाल्यामुळे वृद्धाप वेतन थांबविण्यात आले होते. ही गोष्ट लक्षात येताच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचण दूर करून त्यांची पेन्शन पुन्हा सुरू केली आहे.
Source link



