Uncategorized

चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने केला सर

चेन्नई 8 गड्यांनी पराभूत : साई सुदर्शनची 87 धावांची खेळी : विजयासह गुजरात पाचव्या स्थानी  

वृत्तसंस्था/ चेन्नई

रविवारी चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 7 बाद 158 धावा करता आल्या. यानंतर गुजरातने विजयी लक्ष्य 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पार करत विजयाला गवसणी घातली. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. सामन्यात 25 धावांत 3 बळी घेणाऱ्या गुजरातच्या कागिसो रबाडाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात दणकेबाज झाली. सलामीवीर साई सुदर्शनने संयमी पण आक्रमक खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले आणि साई सुदर्शनच्या 87 धावांच्या जोरावर गुजरातने विजय मिळवला. साईने शानदार खेळी साकारताना 46 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारासह 87 धावांची खेळी साकारली. सुदर्शन व्यतिरिक्त, कर्णधार शुभमन गिलने 33 धावा आणि जोस बटलरने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. चेन्नईच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना चेपॉकच्या खेळपट्टीवर एकही विकेट काढणे कठीण झाले होते. गुजरातने 16.2 षटकांत 2 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले.

चेन्नईची पुन्हा घसरगुंडी

प्रारंभी, गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईकडून सलामीला आलेला संजू सॅमसन स्वस्तात माघारी परतला. संजूने गेल्या सामन्यात शतक झळकावलं होते पण या सामन्यात तो अवघ्या 11 धावांवर माघारी परतला. तर उर्विल पटेल अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. सरफराज खानला भोपळाही फोडता आला नाही तर डेवाल्ड ब्रेविस 2 धावा करुन माघारी परतला. यामुळे सीएसकेची 4 बाद 37 अशी स्थिती झाली होती. या कठीण परिस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी डाव सावरला. दोघांनी मिळून 59 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मात्र गायकवाडची फलंदाजी पूर्णपणे वेगळीच दिसत होती. एका क्षणी तो 36 चेंडूत फक्त 20 धावांवर होता, पण त्यानंतर त्याने गियर बदलला आणि पुढच्या 13 चेंडूत 30 धावा काढत 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये चेन्नईने तब्बल 83 धावा ठोकत 158 धावापर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 74 धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 7 बाद 158 (संजू सॅमसन 11, ऋतुराज गायकवाड नाबाद 74, शिवम दुबे 22, कार्तिक शर्मा 15, जेमी ओव्हर्टन 18, रबाडा 3 बळी, अर्शद खान 2 बळी, मोहम्मद सिराज आणि मानव सुतार प्रत्येकी 1 बळी)

गुजरात टायटन्स 16.4 षटकांत 2 बाद 162 (साई सुदर्शन 46 चेंडूत 87, शुभमन गिल 33, जोस बटलर नाबाद 39, सुंदर नाबाद 1, अकिल होसेन आणि नूर अहमद प्रत्येकी 1 बळी).

चेन्नईवरील विजयाचा गुजरातला फायदा, पाचव्या स्थानी झेप

चेन्नईवरील दणदणीत विजयानंतर गुजरात टायटन्सला गुणतालिकेत चांगलाच फायदा झाला आहे. सध्याच्या घडीला गुजरात टायटन्सने 8 सामन्यांत 4 विजय आणि 4 पराभवांसह 8 गुण मिळवून सातव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला असून त्यांच्या प्ले-ऑफच्या गणितावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​