आरसीबीचा गुजरातवर ‘विराट’ विजय

गुजरात टायटन्स 5 विकेट्सनी पराभूत : सामनावीर विराटची 81 धावांची खेळी : साई सुदर्शनचे शतक मात्र वाया
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने आपला विजयरथ कायम राखत गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या शानदार शतकाच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 3 बाद 206 धावांचा डोंगर उभारला. यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी तुफानी फलंदाजी करत डाव सांभाळला आणि निर्णायक क्षणी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आरसीबीचा संघ 10 गुणासह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेकब बेथेल 14 धावा काढून बाद झाला. यानंतर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी वादळी फटकेबाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. विराट व पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी रचली. पडिक्कलने 27 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारांसह 55 धावांची शानदार खेळी केली. चेसमास्टर विराटने आपल्या अनोख्या शैलीत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 44 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 81 धावांचे योगदान दिले. शतक मात्र त्याला पूर्ण करता आले नाही. विराट बाद झाल्यानंतर सलग दोन षटकांत जितेश शर्मा व रजत पाटीदार बाद झाले. यामुळे आरसीबी संघावरचा दबाव वाढला. यानंतर कृणाल पांड्याने 17 व्या षटकात उत्कृष्ट फटकेबाजी केली. या षटकात त्याने 2 चौकार व 1 षटकार लगावला आणि 19 व्या षटकात चौकार लगावत त्याने संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने विजयी टार्गेट 18.5 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
साई सुदर्शनचे शतक
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. गिलने 24 चेंडूत 32 धावा केल्या. साई सुदर्शन शेवटपर्यंत ठाम उभा राहिला आणि आयपीएलमधील आपले तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 57 चेंडूत शतक झळकावले. अखेर जोश हेझलवूडने त्याला बाद केले. सुदर्शनने 58 चेंडूत 100 धावांची खेळी केली, ज्यात 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यानंतर बटलरने 16 चेंडूत 25 धावा केल्या. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर (12 चेंडूत नाबाद 19) आणि जेसन होल्डर (10 चेंडूत नाबाद 23) यांनी जोरदार फटकेबाजी करत गुजरातचा स्कोर 206 पार नेला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 3 बाद 205 (साई सुदर्शन 100, शुभमन गिल 32, जोस बटलर 25, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 19, जेसन होल्डर नाबाद 23, भुवनेश्वर कुमार, हॅझलवूड आणि सुयश राणा प्रत्येकी 1 बळी)
आरसीबी 18.5 षटकांत 5 बाद 206 (बेथेल 14, विराट कोहली 81, पडिक्कल 55, पाटीदार 8, जितेश शर्मा 10, कृणाल पांड्या नाबाद 23, रशीद खान 2 बळी, मानव सुतार, सिराज आणि होल्डर प्रत्येकी 1 बळी).
विराटचे आयपीएलमध्ये 800 चौकार
विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान विराटने आयपीएलमध्ये 800 चौकार पूर्ण करण्याचा मान मिळवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्या खालोखाल शिखर धवन (768 चौकार) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर (663), रोहित शर्मा (653) यांचा नंबर लागतो.
-कोहलीचे आयपीएलमध्ये 800 चौकार, 300 षटकार पूर्ण
-गुजरातच्या साई सुदर्शनचे आयपीएलमधील तिसरे शतक
-साई सुदर्शनचा आयपीएलमध्ये सर्वात जलद 2000 धावा जमविण्याचा विक्रम.
-गेलने 48 डावांत तर साई सुदर्शनने 47 व्या डावांत हा टप्पा गाठला.
Source link



