युवा खेळाडूंबाबत उत्सुकता

— उदय बिनीवाले.
थेट सवाई मानसिंग स्टेडीयम, जयपूर.
आयपीएल स्पर्धेतील राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील महत्त्वाचा सामना उद्या जयपूर येथील सवाई मानसिंग या देखण्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
सध्या गुणतालिकेत राजस्थान दुसऱ्या व हैदराबाद चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात ‘काटे की टक्कर’ अपेक्षित आहे.
सामन्यातील हार-जीत याचबरोबर सर्वांचे लक्ष असेल ते युवा / तरुण खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे. भारतीय क्रिकेट संघ सध्या एका स्थित्यंतरातून जात आहे. अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, शमी यांचा कार्यकाळ अस्ताकडे निघाला आहे. सबब ही पोकळी भरून काढणे अत्यावश्यक आहे. क्रिकेटमध्ये भारत ‘दादा’ आहे. हा लौकीक टिकवण्यासाठी तितक्याच दर्जेदार खेळाडूंनी हे शिवधनुष्य उचलले पाहिजे. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ईशान किशन, रिंकू सिंग, प्रफुल हिंगे हे खेळाडू भारताचे भविष्य/भवितव्य आहेत. आज यांच्या कामगिरीकडे सारे रसिक डोळे लावून बसले असतील हे निश्चित.
उभय संघ आयपीएलमध्ये 22 वेळा भिडले असून राजस्थान 9 आणि हैदराबाद 13 विजय अशी स्थिती आहे. राजस्थानने 242/6 व हैदराबादने 286/6 अशी उच्चतम धावसंख्या नोंदविली आहे. जोस बटलर याने राजस्थानकडून 124 सर्वोच्च धावा केल्या असून ईशान किशनने 106 धावा हैदराबादकडून केल्या आहेत.
जयपूरच्या चटका लावणाऱ्या उन्हात दोन्ही संघ 5 नंतर सरावासाठी मैदानात उतरले. सामन्याच्या पूर्वसंध्येस हैदराबादचा प्रशिक्षक डॅनिअल व्हेटेरीने समीक्षकांशी संवाद साधला. तो म्हणाला, पॅट कमीन्स फिट असून या सामन्यात नेतृत्व करेल. राजस्थानला घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा आमचा मानस आहे.
राजस्थानचा प्रशिक्षक कुमार संगकारा म्हणाला, मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाबाबत आम्ही मेहनत घेतली आहे. रियान पराग उत्कृष्ट नेतृत्व करत असून संघ उत्तम कामगिरी करीत आहे.
Source link



