मळगाव घाटीत २० पोती कचरा गोळा करीत स्वच्छता मोहीम

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांचा पुढाकार
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी रेल्वे स्टेशन रोड वरून येताना माजगावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मळगाव घाटीत कचऱ्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर बनली आहे. याची माजगाव मतदार संघाचे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी दखल घेत माजगावातील युवकांसोबत मंगळवारी सकाळी मळगाव घाटीत स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत हा परिसर स्वच्छ करून तब्बल २० पोती कचरा गोळा करण्यात आला. त्यामुळे जितेंद्र गावकर यांच्यासह या युवकांचे कौतुक होत आहे.माजगाव गावाच्या सीमेवर असलेल्या मळगाव घाटीत अज्ञातांकडून अनेक वेळा घरगुती कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त होऊन परिसरात दुर्गंधीही पसरते. याबाबत वन खात्याकडून कचरा न टाकण्याचे आवाहन करून याबाबत कायदेशीर कारवाईचा इशारा देऊनही कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.त्यामुळे पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी पुढाकार घेऊन माजगावातील युवकां सोबत या घाटीत स्वच्छता मोहीम राबवली. संपूर्ण घाट फिरून कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रसाद सावंत, ओमकार सावंत, संतोष पाटकर, मंदार सावंत, जीवन सावंत, हर्षल चौगुले, बाबुराव तेंडुलकर, देवराज राणे या तरुणांचा समावेश होता.
कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
आपण आपले घर व परिसर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. सार्वजनिक ठिकाणांसह रस्त्यावर किंवा गटारात कचरा टाकून अस्वच्छता निर्माण हे अशोभनीय आहे. त्यामुळे करणे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता राखावी. तसेच यापुढे मळगाव घाटीत अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर वन खात्याने कठोर कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी केली आहे .
Source link



