हैदराबादचा ‘प्रफुल्लित’ विजय

राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात : नागपूरचा प्रफुल हिंगे ठरला सामन्याचा हिरो : अवघ्या 34 धावांत मिळवले 4 बळी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सामनावीर प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन या दोन रायझिंग स्टारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सच्या धुरंधरांना रोखत हैदराबादने आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या दोन्ही जलदगती गोलंदाजांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि क्लासेनच्या जोरावर हैदराबादने 6 बाद 216 धावा करत राजस्थानसमोर 217 धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 19 षटकांत 159 धावांवर आटोपला.
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने पहिल्याच षटकात गुडघे टेकले. प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल व लुहान ड्रे प्रिटोरियस या तिघांना भोपळाही फोडू दिला नाही. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात 3 विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. यानंतर दुसऱ्या षटकात साकिब हुसेनने यशस्वी जैस्वालला एका धावेवर बाद केले. यानंतर रियान पराग प्रफुल हिंगेचा बळी ठरला. रवींद्र जडेजा व डोनोवन फरेरा या जोडीने 72 चेंडूत 118 धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. फरेरा 44 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारांसह 69 तर रवींद्र जडेजा 32 चेंडूत 5 चौकारांसह 45 धावा करत बाद झाला. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये तुषार देशपांडेने 11 चेंडूत 3 षटकारांसह 25 धावांची खेळी केली. इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्यामुळे राजस्थानचा संघ 19 षटकांत 159 धावांवर ऑलआऊट झाला आणि हैदराबादने हा सामना 57 धावांनी जिंकला.
ईशान किशनची क्लास इनिंग
प्रारंभी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडलाही मोठी खेळी साकारता आली नाही. 18 धावांवर तो रियान परागच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशनने 44 चेंडूत 91 धावांची दमदार खेळी केली. राजस्थानच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना त्याला संदीप शर्माने बाद केले. ईशान बाद झाल्यानंतर हेन्री क्लासेनने 26 चेंडूत 40 धावांची खेळी केली. तसेच नितीश कुमार रे•ाrने 13 चेंडूत केलेल्या 28 धावा आणि सलिल अरोराच्या 13 चेंडूतील नाबाद 24 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 216 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 216 (अभिषेक शर्मा 0, टॅव्हिस हेड 18, ईशान किशन 44 चेंडूत 91, हेनरिक क्लासेन 40, नितीश कुमार रे•ाr 28, सलील अरोरा नाबाद 24, जोफ्रा आर्चर 2 बळी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि रियान पराग प्रत्येकी 1 बळी).
राजस्थान रॉयल्स 19 षटकांत सर्वबाद 159 (रियान पराग 4, रवींद्र जडेजा 45, डोनोवन फरेरा 69, तुषार देशपांडे 25, प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन प्रत्येकी 4 बळी, इशान मलिंगा 2 बळी).
Source link



