लनाला यायचं… पण सावध रहायचं !

सायबर गुन्हेगारांकडून एपीके फाईलद्वारे लग्नाचे आमंत्रण, फसवणूक टाळण्यासाठी फाईल न उघडणेच इष्ट
बेळगाव : बुधवार दि. 8 एप्रिलचा दिवस. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षणाधिकारी एम. एम. कांबळे यांच्या नावे त्यांच्या परिचितांच्या व्हॉट्सअॅपवर एपीके फाईलच्या माध्यमातून लग्नपत्रिका आली. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेली लग्नपत्रिका आहे, अशीच बहुतेकांची समजूत होती. मात्र, ती त्यांनी पाठवलेली नव्हती. त्यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या संपर्कातील प्राध्यापक, पत्रकार, नातेवाईकांना लग्नपत्रिकेच्या माध्यमातून एपीके फाईल पाठवून ठकविण्याचा प्रयत्न झाला होता.
अनेकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा झाली. लगेच त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणात कोणाची फसवणूक झाली नसली तरी सायबर गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात सावजांना ठकविण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. ‘अँड्रॉईड अॅप्लिकेशन पॅकेज’ला एपीके फाईल म्हणतात. सध्या बेळगाव शहर व जिल्ह्यात एपीके फाईल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
बेळवडी, ता. बैलहोंगल येथील 49 वर्षीय सरकारी अधिकारी असलेल्या एका महिलेच्या व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिकेच्या माध्यमातून एपीके फाईल आली. कोणाचे लग्न आहे? या कुतूहलाने संबंधित महिलेने त्या फाईलवर क्लिक केले. 2 एप्रिल 2026 रोजी त्या महिला अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून 2 लाख 17 हजार 705 रुपये हडप करण्यात आले. आपल्या खात्यातील रक्कम कशी गेली? याची कल्पनासुद्धा त्या महिलेला आली नाही.
विद्यानगर, बेळगाव येथील 48 वर्षीय पीडीओ महिलेच्या व्हॉट्सअॅपवर 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता एपीके फाईल आली. त्यांनी या फाईलवर क्लिक करताच ती डाऊनलोड झाली. लगेच त्यांच्या बँक खात्यातून 5 लाख 16 हजार 833 रुपये सायबर गुन्हेगारांनी पळविले. मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्स्फर झाल्यासंबंधी बँकेकडून एसएमएस आल्यावरच या महिलांना आपण फसलो गेलो, याची कल्पना आली.
1 जानेवारी ते 8 एप्रिलपर्यंत चालू वर्षी बेळगाव जिल्ह्यात एपीके फाईलच्या माध्यमातून तिघा जणांची व शहर परिसरातील तिघा जणांची सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणूक केल्याचे सायबर क्राईम विभागात नोंद झाली आहे. गेल्या पंधरवड्यात मात्र एपीके फाईल पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. चौकशीसाठी सायबर क्राईम विभागाकडे रोज 3 ते 5 जण येऊ लागले आहेत.
डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास झटपट नफा देण्याचे सांगून यापूर्वी मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती. आता यामध्ये एपीके फाईलची भर पडली आहे. पूर्वी तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, असे सांगत ओटीपी मिळवून सावजांना ठकविण्यात येत होते. आता एपीके फाईलवर जर मोबाईलधारकाने क्लिक केले तर त्याच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यासाठी ओटीपीचीही गरज भासत नाही.
वारंवार जागृती तरीही फसवणूक
सायबर क्राईम विभागाकडून वारंवार जागृतीची मोहीम राबविण्यात येते. तरीही फशी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होईना, अशी स्थिती आहे. मध्यंतरी मेगा गॅसच्या नावाने फसवणूक सुरू होती. सध्या त्याचे प्रमाण कमी झाले असले तरी अशा घटना पूर्णपणे थांबल्या नाहीत. बेळगाव शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांच्या गळाला अनेक जण सहजपणे लागत आहेत. काही जणांना लाखो रुपयांचा, काही जणांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. तरीही लोक जागृत होताना दिसत नाहीत.
सध्या बहुतेकांच्या हातात महागडे अँड्रॉईड फोन आहेत. व्हॉट्सअॅपसह अनेक मेसेंजर अॅप प्रत्येकजण वापरतो. सायबर गुन्हेगार याच अॅपचा फसवणुकीसाठी आधार घेताना दिसत आहेत. एपीके फाईल पाठवून एखाद्याचा मोबाईल हॅक केला की त्याच्या संपर्कातील प्रत्येक माणसाला त्याच मोबाईलधारकाच्या नावे एपीके फाईल पाठविली जाते. मेसेज पाठविणारी व्यक्त आपल्या परिचयाची आहे म्हणून जर कोणी त्या फाईलवर क्लिक केले तर त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जातो. अशी ही साखळी वाढत जाते. त्यांच्या बँक खात्यात रक्कम किती आहे? हे सहजपणे गुन्हेगार जाणून घेतात व मोठी रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतात. यासाठीही म्यूल खात्यांचाच वापर केला जातो.
आपल्याशी संबंधित नसलेल्या फाईलवर क्लिक करू नये
एपीके फाईलच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. पीएम किसान योजना, आरटीओ चलन, ट्रॅफिक चलन, लग्नपत्रिकांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार एपीके फाईल पाठवतात. आपल्याशी संबंधित नसलेल्या फाईलवर मोबाईलधारकांनी क्लिक करू नये. नाहीतर त्यांची फसवणूक ठरलेलीच, अशी माहिती जिल्हा सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांनी दिली. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे हा एकच यावरील उपाय आहे. जर चुकून कोणी एपीके फाईलवर क्लिक केले तर लक्षात येताच 1930 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. पोलीस स्थानकाला येण्यापूर्वी काही जण आपल्या मोबाईलमधून ती फाईल डिलिट केलेली असतात. अशावेळी गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. व्हॉट्सअॅपमधून एपीके फाईल डिलिट केल्यानंतर सायबर गुन्हेगारांचा संपर्क तुटतो. ही गोष्ट खरी असली तरी फसवणुकीनंतर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती फाईल महत्त्वाची असते. फसवणूक होण्याआधीच ही गोष्ट लक्षात आली तर एपीके फाईल डिलिट करावी, असे आवाहनही सुनीलकुमार यांनी केले.
-पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर
Source link



