डॉ. आंबेडकर उद्यानात स्वच्छता

बेळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख कार्यक्रमस्थळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात स्वच्छता, दुऊस्ती आणि रंगरंगोटीची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेकडून ही कामे हाती घेण्यात आली असून जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महापालिका व कन्नड संस्कृती खात्याच्यावतीने यंदा जयंती मोठ्या प्रमाणावर आणि भव्य स्वरुपात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उद्यान परिसरात सर्वत्र साफसफाई करून झाडाझुडुपांची छाटणी, पथदिव्यांची दुऊस्ती, रंगरंगोटी, तसेच पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. जयंतीदिनी मोठ्या संख्येने नागरिक, अनुयायी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाने कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली आहे.
कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू असून उद्यान परिसरात विविध ठिकाणी मंडप उभारले जात आहेत. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्याची सोय, प्रकाशयोजना, तसेच सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर दिला जात आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, उदयकुमार तसेच इतर अधिकाऱ्यांनी उद्यानाला भेट देऊन कामांची पाहणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध सूचना मांडल्या. कार्यक्रम शिस्तबद्ध आणि सुयोजित व्हावा, यासाठी काही महत्त्वाच्या बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. अधिकाऱ्यांनी या सर्व सूचनांची दखल घेत त्यांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
Source link



