रामलिंगखिंड गल्लीत बेशिस्त पार्किंगमुळे रहदारीस समस्या

त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : रामलिंगखिंड गल्लीत बेशिस्त व अवाढव्यपणे वाहने पार्क करण्यात येत असल्याने रहदारीस समस्या येत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीचा सामानाही करावा लागत असून नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. सदर समस्या कायमस्वरुपी असून खरेदीसाठी येणारे नागरिक आपली चारचाकी वाहने व दुचाकी बेशिस्तपणे पार्क करत आहेत. यामुळे नागरिकांना याचा फटका बसत असून पोलीस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रामलिंगखिंड गल्ली हा शहरातील एक प्रमुख मार्ग असल्याने या भागात दररोज वाहनांची मोठी वर्दळ असताना रस्त्याच्या दुतर्फा अनियमित पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. सदर समस्या कायमस्वरुपी बनली आहे. विशेषत: खरेदीसाठी येणारे नागरिक आपली चारचाकी व दुचाकी वाहने कुठेही पार्क करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी रस्ता अऊंद होत असून वाहनांना मार्ग काढणे कठीण होत आहे. यामुळे शहरवासीय व या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असून अनेकदा वाहनांची लांबचलांब रांग लागते. परिणामी वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असूनही संबंधित यंत्रणेकडून पुरेशी कारवाई होत नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे पोलीस विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Source link



