आचिर्णेत बंदूकीची गोळी लागून युवकाचा जागीच मृत्यू

शिकारीला गेले असतानाची घटना ;अन्य एक युवक गंभीर जखमी
वैभववाडी / प्रतिनिधी
वैभववाडी आचिर्णे येथे बंदूकीची गोळी लागून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. दोन्ही युवक शिकारीसाठी गेले होते.या गोळीबाराच्या घटनेने तालुका हादरला आहे. आचिर्णे- घाणेगडवाडी येथील सागर सुरेश पोटळे (26) व कृष्णा सुरेश कातकर (25) हे तेथील कालव्या नजीकच्या जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी गोळीबार होऊन यातील सागर पोटळे हा युवक जागीच ठार झाला. तर कृष्णा कातकर हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. शिवाय अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. गोळीबाराची घटना अपघात आहे की अन्य काही कारण आहे याचा पोलीस तपास करीत आहेत.
Source link



