Uncategorized

लंकेचा संघ अद्याप 238 धावांनी पिछाडीवर

सूर्यबंदारा, सोनल दिनुशा यांची अर्धशतके, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार प्रत्येकी 3 बळी

वृत्तसंस्था, कोलंबो

सोनल दिनुशा आणि पसिंदु सूर्यबंदारा यांच्या समयोचित अर्धशतकांमुळे लंकेला पहिल्या डावात सावरले. दिवसअखेर लंकेने पहिल्या डावात 8 बाद 265 धावा जमविल्या असून अद्याप ते 238 धावांनी पिछाडीवर आहेत. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. पावसामुळे तिसऱ्या दिवशीचा खेळ लवकर थांबविण्यात आला.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकून लंकेवर आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत भारताच्या 503 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना लंकन संघाने मंगळवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चिवट फलंदाजी करत आणखी सहा गडी गमविताना 257 धावा जमविल्या. लंकेने 2 बाद 8 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये त्यांनी आणखी दोन गडी गमविताना 122 धावांची भर घातली. उपाहारावेळी लंकेने 32 षटकांत 4 बाद 130 धावा जमविल्या होत्या. सूर्यबंदारा 65 तर डिसिल्वा 4 धावांवर खेळत होते. प्रसिद्ध कृष्णाने सलामीच्या मिशाराला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. कमिंदु मेंडीस आणि सूर्यबंदारा यांनी चौथ्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केली. उपाहारापूर्वी लंकेची ही जोडी प्रसिद्ध कृष्णाने फोडली. त्याने कमिंदु मेंडीसला जडेजा कडवी झेलबाद केले. त्याने 58 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. या पहिल्या सत्रामध्ये लंकेने भारतीय गोलंदाजांसमोर चिवट फलंदाजी केली. सूर्यबंदाराने 76 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. उपाहाराला खेळ थांबला आणि पावसाला प्रारंभ झाल्याने खेळाच्या दुसऱ्या सत्राला उशीरा सुरुवात झाली.

खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी बऱ्यापैकी झाली. त्यांनी लंकेचे तीन फलंदाज 86 धावांच्या मोबदल्यात बाद केले. चहापानावेळी लंकेची स्थिती 65 षटकांत 7 बाद 216 अशी होती. या सत्रामध्ये फिरकी गोलंदाज मानव सुथारला खेळपट्टीची साथ मिळू लागली. कर्णधार धनंजय डिसिल्वा मानव सुथारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 8 धावा केल्या. रविंद्र जडेजाने सूर्यबंदाराचा त्रिफळा उडविला. त्याने 133 चेंडूत 9 चौकारांसह 80 धावा जमविताना दिनुशा समवेत सहाव्या गड्यासाठी 34 धावांची भर घातली. मोहम्मद सिराजने डिक्लेलाला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. लंकेची यावेळी स्थिती 7 बाद 173 अशी होती. या सत्रामध्ये दिनुशाने अर्धशतक 82 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानावेळी तो 52 तर नुवांता 13 धावांवर खेळत होते.

खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पावसाचा वारंवार अडथळा आला. या सत्रात लंकेने 1 गडी गमविताना 49 धावा जमविल्या. नुवांता आणि दिनुशा या जोडीने आठव्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केल्याने लंकेला दिवसअखेर 250 धावांचा टप्पा ओलांडला. मानव सुथारने या सत्रामध्ये नुवांताला झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. दिनुशा 137 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 85 तर कुमारा 1 चौकारांसह 8 धावांवर खेळत आहेत. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णाने 47 धावांत 3 तर मानव सुथारने 83 धावांत 3 तसेच मोहम्मद सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पावसाला शेवटच्या सत्रात पुन्हा प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या दिनुशाचे हे तिसरे अर्धशतक आहे.

संक्षिप्त धावफलक: भारत प. डाव 138 षटकांत 9 बाद 503 डाव घोषित, लंका प. डाव 83.4 षटकांत 8 बाद 265 (सूर्यबंदारा 80, सोनल दिनुशा खेळत आहे 85, कमिंदु मेंडीस, 32, मिशारा 19, नुवांता 18, डिसिल्वा 8, डिक्वेला 0, उदारा 1, जयसूर्या 2, कुमारा खेळत आहे 8, अवांरत 12, प्रसिद्ध कृष्णा 3-47, मानव सुथार 3-83, मोहम्मद सिराज 1-33, रविंद्र जडेजा 1-45).

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​