5 Died NH4 Accident कोल्हापूर -पुणे महामार्गावर भीषण अपघात, कसबा आरळे गावच्या दोन भाविकांचा जागीच मृत्यू तर पाच गंभीर जखमी

कसबा बीड / वार्ताहर
कोल्हापूर -रविवारी पुणे- बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात करवीर तालुक्यातील कसबा आरळे गावच्या दोन भाविकांचा जागीच मृत्यू तर पाच गंभीर जखमी झाले आहेत .या घटनेने आरळे गावावर शोककळा पसरली आहे .मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कसबा आरळे गावचे रहिवाशी आहेत. देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते. सातारा परिसरातील डी-मार्टजवळ आले असता, त्यांच्या भरधाव मिनी बसने पुढे असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे पावणेपाच वाजता झाला .ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हल बसचा दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे( वय 17)आणि एकनाथ बापू कांबळे (68)या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राजीव नवले,पोलीस निरीक्षक निलेश तांबे,सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर,हवालदार किशोर वायदंडे,स्थानिक शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढले.
शिवेंद्रराजेंची रेस्क्यू टीम
शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे सर्व पाचही जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे कसबा आरळे गावावर शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
जेजूरीहून परतत होते
जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या आजोबा एकनाथ बापू कांबळे व नात स्नेहल उत्तम कांबळे मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . आरळे गावचे पोलीस पाटील उत्तम कांबळे यांचे कुटुंबीय असल्याने संपूर्ण गावामध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे .
Source link



