1965 च्या युद्धातील वीरपुत्राला अभिवादन; शहीद देवू सावंत यांच्या स्मृती दिनानिमित्त १६ सप्टेंबरला कार्यक्रम

ओटवणे (प्रतिनिधी) : 1965 च्या भारत-पाक युद्धात देशाच्या रक्षणासाठी शौर्याने लढत वीरमरण पत्करलेले देवसू गावचे सुपुत्र शहीद कै. देवू सिताराम सावंत यांच्या 61 व्या स्मृती दिनानिमित्त बुधवार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता देवसू वरचीवाडी येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद देवू सिताराम सावंत यांच्या त्यागाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखम सावंत भोसले, आमदार तथा माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार कर्नल सुधीर सावंत, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
1965 च्या भारत-पाक युद्धात भारतमातेच्या संरक्षणासाठी लढताना शहीद देवू सावंत यांनी दाखवलेले असीम शौर्य आणि केलेला त्याग आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात देवसू परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
यावेळी शहीद देवू सिताराम सावंत यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्राच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हनुमंत उर्फ मंथा सावंत, सिताराम सावंत, महादेव सावंत, आनंद सावंत, सौ. शकुंतला सावंत आणि सावंत कुटुंबीयांनी केले आहे.
Source link



