Uncategorized

सिंधुदुर्गच्या जैववैभवावर विकास प्रकल्पांचे सावट!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध आणि अतिसंवेदनशील जैवविविधतेचे संरक्षण ही काळाची गरज असून, मायनिंग, अवैध खाणकाम तसेच शक्तीपीठ महामार्गासारखे विकास प्रकल्प या नैसर्गिक ठेव्याला कायमस्वरूपी धोका निर्माण करू शकतात, असा सूर आंबोली-चौकूळ येथे झालेल्या जैवविविधता परिसंवादात उमटला. डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट येथे सिंधुदुर्ग डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लबतर्फे आयोजित परिषदेत विविध वैद्यकीय विषयांवरील व्याख्यानांसोबत “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता आणि तिच्यासमोरील आव्हाने” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.

या परिसंवादात जिल्ह्याचे वन्यजीव रक्षक संजय सावंत, पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब, फुलपाखरे व चतूर किटकांचे अभ्यासक हेमंत ओगले, संशोधक डॉ. दत्तप्रसाद सावंत तसेच जैवविविधता अभ्यासक काका भिसे यांनी मार्गदर्शन केले. तिलारी परिसरात पट्टेरी वाघाचे बारमाही अस्तित्व आणि विकसित होत असलेल्या व्याघ्र प्रजनन क्षेत्राबाबत संजय सावंत यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या २५० वरून ४०० हून अधिक झाल्याची माहिती देताना भाग्यश्री परब यांनी बेसुमार वृक्षतोडीमुळे दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवासाला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे सांगितले.

हेमंत ओगले यांनी पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा आढावा घेत आंबोली-चौकूळ परिसरातील फुलपाखरांच्या विविध प्रजाती आणि डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्यासह शोधलेल्या चतूर किटकाच्या नव्या प्रजातीची माहिती दिली. डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी संपूर्ण श्रीलंकेत आढळणाऱ्या चतूर किटकांच्या प्रजातींच्या संख्येइतक्याच प्रजाती एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्याचे सांगून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. काका भिसे यांनी जैवविविधता, पर्यटन, शासकीय धोरणे आणि पर्यावरणासमोरील वाढती आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्गचा निसर्ग हा अत्यंत दुर्मिळ आणि अतिसंवेदनशील असून, पश्चिम घाटासह हा परिसर जगातील ३६ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे. हा अमूल्य नैसर्गिक वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले. परिषदेला उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील डॉक्टरांनी हा परिसंवाद अत्यंत माहितीपूर्ण व विचारप्रवर्तक असल्याची भावना व्यक्त केली. अशा प्रकारचे परिसंवाद जिल्ह्याच्या विविध भागांत नियमितपणे आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​