सावंतवाडी-असनिये बसमध्ये सापडलेली10 हजारांची पर्स केली परत; वाहक बी. एल. कासार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

ओटवणे (प्रतिनिधी) : एसटी बसमध्ये महिला प्रवाशाची रोख रकमेसह राहिलेली पर्स प्रामाणिकपणे परत करत बस वाहकाने माणुसकीचा आदर्श घालून दिला. सावंतवाडी-असनिये बसमध्ये सापडलेली 10हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पर्स वाहक बी. एल. कासार यांनी चौकशी करून संबंधित महिला प्रवाशाकडे सुपूर्द केली.
असनिये येथील पुष्पलता गणपत कदम या सावंतवाडी-असनिये बसने प्रवास करत होत्या. बांदा बस स्थानकात त्या उतरल्या; मात्र त्यांची पर्स बसमध्येच राहिली. गणपती सणासाठी त्यांनी बँकेतून काढलेले 10 हजार रुपये या पर्समध्ये होते. बांदा बाजारपेठेत गेल्यानंतर पर्स बसमध्ये राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, बस असनियेच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर वाहक बी. एल. कासार यांच्या निदर्शनास सीटवर पडलेली पर्स आली. त्यांनी तात्काळ बांदा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक पी. जी. सावंत यांना याची माहिती दिली.
तोपर्यंत पुष्पलता कदम या पर्स हरवल्याची माहिती देण्यासाठी बांदा बस स्थानकात पोहोचल्या होत्या. बस असनियेहून पुन्हा बांदा बस स्थानकात आल्यानंतर वाहतूक नियंत्रक पी. जी. सावंत यांच्या उपस्थितीत वाहक बी. एल. कासार यांनी रोख रकमेसह पर्स पुष्पलता कदम यांच्याकडे सुपूर्द केली.
वाहक बी. एल. कासार यांच्या प्रामाणिकपणामुळे महिला प्रवाशाला तिची रक्कम सुरक्षितपणे परत मिळाली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Source link



