शिवम’ची चौकशी सीआयडीकडे!

बहुचर्चित शिवम असोसिएट्स या आर्थिक व्यवहार चालवणाऱ्या संस्थेविरुद्ध सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा एफआयआर दाखल केले असून संस्थेचा सर्वेसर्वा शिवानंद सिद्धाप्पा निलण्णावर (वय 47) याला अटक झाली आहे. या संस्थेतील व्यवहार आंतरजिल्हा व आंतरराज्य पातळीवरील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले आहे.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणासंबंधी माहिती दिली असून गुंतवणूकदारांचे हित जपणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे या दोघा जणांनी सांगितले आहे. संस्थेची उलाढाल व व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे चौकशीही मोठ्या प्रमाणात होणार आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी आवश्यक कोणतीच परवानगी या संस्थेने घेतली नसल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
शिवमकडे आरबीआय, सेबी, सहकार खात्याची परवानगी नाही
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, आपल्या कार्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून केपीआयडी विभाग सुरू आहे. या विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आर्थिक संस्थांवर, त्यांच्या कारभारावर, व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या विभागात स्वत: आपण, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीसप्रमुख, सहकार खात्याचे अधिकारी, कमर्शियल टॅक्स विभागाचे अधिकारी आहेत. या विशेष विभागात गेल्या दोन महिन्यांपासून शिवम असोसिएट्सच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात आले होते. मार्केट इंटेलिजन्स, पोलीस आयुक्तांनी पाठवलेला सविस्तर अहवाल यातून शिवम असोसिएट्सने आरबीआय, सेबी, सहकार खाते किंवा इतर कोणत्याही तत्सम संस्थांची परवानगी घेतली नाही, हे आढळून आले आहे.
35 हजारहून अधिक गुंतवणूकदार
शिवम असोसिएट्समधील गुंतवणूकदारांची संख्या 35 हजाराहून अधिक आहे. सहकार खात्याच्या असिस्टंट रजिस्ट्रार को-ऑप. सोसायटी यांनाही चौकशीची सूचना दिली होती. या संस्थेकडून होणाऱ्या व्यवहारात कायद्याचे उल्लंघन होते आहे का? याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यांनीही आपला अहवाल दिला आहे. चौकशीत कोट्यावधी रुपयांचा नियमबाह्या व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे शुक्रवार दि. 15 मे रोजी रात्री माळमारुती पोलीस स्थानकात शिवानंद निलण्णावर यांच्यावर एफआयआर दाखल केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्य सरकारलाही अहवाल पाठवला
प्रांताधिकारी श्रवणकुमार नायक यांनाही चौकशी करण्याचा आदेश आपण दिला होता. त्यांनीही शुक्रवारी आपला अहवाल दिला आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीला दरवर्षी 36 टक्के नफा देण्याची जाहिरातबाजी या संस्थेने केली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या 150 पानांच्या चौकशी अहवालानंतर आपण राज्य सरकारलाही अहवाल पाठवला आहे. महसूल विभागाच्या सचिवांनाही बेळगाव येथील संपूर्ण ाडामोडींची माहिती देण्यात आली आहे. विशेष न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणांची सुनावणी होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आरबीआयने आर्थिक व्यवहार चालवण्यासाठी परवानगी दिलेल्या संस्थांची यादी त्यांच्या वेबसाईटवरच प्रसिद्ध केली आहे. त्या यादीतही शिवम असोसिएट्सचे नाव नाही. गेल्या दहा वर्षांपासून या संस्थेचे व्यवहार सुरू आहेत. शिवानंद निलण्णावर यांच्या सहकाऱ्यांवरही नजर ठेवण्यात आली आहे. त्यांच्याविषयी सरकारला पाठवलेल्या अहवालात आपण माहिती दिली आहे. त्यांनाही चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शासकीय यंत्रणांची त्यांच्यावर नजर होती. तपासणीच्या वेळी बाँड, चेकबुक सापडली आहेत, असे सांगतानाच गुंतवणूकदारांनी अशा बेकायदा संस्थांमध्ये गुंतवणूक करून आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. गुंतवणूकदारांचे हित जपणे आपले पहिले प्राधान्य असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Source link



