वैज्ञानिकाचे अपहरण

वैज्ञानिकांचे अपहरण होणे ही सर्वसामान्य बाब नसली तरी काहीवेळा घडणारी घटना आहे. अशी अपहरणे करण्याचा हेतू त्या वैज्ञानिकाने लावलेल्या शोधाची किंवा त्याने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती त्याच्याकडून मिळविणे हा असू शकतो. तसेच व्यक्तीगत रागापोटीही असे प्रकार घडू शकतात. पण, अमेरिकेतील फ्लोरीडा प्रांतात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने एका वैज्ञानिकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. तिने ज्या कारणासाठी या वैज्ञानिकाचे अपहरण केले आहे, ते समजल्यानंतर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. तिने या वैज्ञानिकाचे अपहरण आपल्या लाडक्या मांजरीला ‘अमर’ बनविण्यासाठी केले आहे, असे या प्रकरणाच्या चौकशीतून समजले आहे.
या वैज्ञानिकापाशी असा उपाय आहे, की ज्यामुळे वार्धक्य आणि मृत्यू टाळला जाऊ शकतो, अशी माहिती या महिलेला समजली होती. अर्थातच ही अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती होती, हे निश्चितच आहे. कारण, अद्यापतावेतो, असा कोणताही शोध लागलेला नाही, की, जो मानव किंवा अन्य कोणत्याही सजीवाला अमर करु शकेल. मानवाचे आयुष्य वाढविणारी आणि बराच काळ त्याला वार्धक्यापासून दूर ठेवणारी औषधे शोधण्याचा प्रयत्न केल्या पाच ते सहा दशकांपासून चालला आहे. तथापि, या संशोधनात फारशी प्रगती झालेली नाही. अद्यापही हे संशोधन त्याच्या पूर्व-प्राथमिक अवस्थेतच आहे. पण या महिलेचा असा विश्वास होता की असा शोध लागलेला आहे. यासाठी तिने या संशोधकाचे अपहरण करण्याचे पाऊल उचलले होते. तिच्या या दु:साहसाची, तसेच त्याहीपेक्षा जास्त ज्या कारणासाठी तिने ते केले, त्याची बरीच चर्चा होत आहे. तिने स्वत: अमर होण्यासाठी असा काही प्रकार केला असता, तर समजू शकले असते. पण तिने मांजराला अमर करण्यासाठी असे केले, हे आश्चर्यकारक आहे.
Source link



