विक्रम मिस्री यांना वर्षाची मुदतवाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने बुधवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या कार्यकाळाला एक वर्षाची म्हणजेच जुलै 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. ‘कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा’ने जारी केलेल्या आदेशानुसार, आता 1989 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी असलेले मिस्री हे त्यांच्या नियोजित निवृत्तीच्या तारखेनंतरही सेवेत कार्यरत राहतील. विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि युरोप, आफ्रिका, आशिया व उत्तर अमेरिकेतील भारतीय दूतावासांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी ब्रुसेल्स, ट्युनिस, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासांमध्येही सेवा बजावली आहे.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्या सेवेला 14 जुलै 2026 नंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजेच ही मुदतवाढ 14 जुलै 2027 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल त्या तारखेपर्यंत) असेल. हा निर्णय ‘एफआर 56(डी)’मधील तरतुदींनुसार घेण्यात आल्याचे सरकारी आदेशात नमूद केले आहे. हा आदेश कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘कार्मिक आणि प्रशिक्षण विभागा’तील ‘मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या सचिवालयाद्वारे 1 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला. या आदेशावर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीच्या सचिव आणि आस्थापना अधिकारी मनीषा सक्सेना यांची स्वाक्षरी आहे.
Source link



