वडगावमध्ये चित्ररथ मिरवणुकीला तुफान प्रतिसाद : सर्वच मंडळांचा देखाव्यांवर भर

बेळगाव : वडगावमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सोमवारी रात्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग हुबेहूब सादर करण्यात आले. त्यामुळे चित्ररथांनी शिवभक्तांचे डोळे दिपवून टाकले. मध्यरात्रीपर्यंत वडगावमधील गल्ल्या शिवभक्तांच्या गर्दीने फुलल्याचे चित्र दिसून आले. बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या एक दिवस आधी वडगावमध्ये चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी 7 ते 8 मंडळांनी चित्ररथ देखावे सादर केले. देखावे पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. वडगावसह अनगोळ, शहापूर, जुने बेळगाव या परिसरातून शिवभक्तांची तोबा गर्दी झाली होती.
रात्री 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन झाले. काही मंडळांनी एकाच ठिकाणी मंडप घालून देखावे सादर केले, तर काही मंडळांनी संपूर्ण वडगावमधील गल्ल्यांमध्ये फिरून देखाव्यांचे सादरीकरण केले. यावर्षी कारभार गल्ली, पाटील गल्ली, वझे गल्ली, सोनार गल्ली, दत्त गल्ली, रयत गल्ली यासह इतर मंडळांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगाव परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर पोलिसांची फिरती वाहने सर्वत्र गस्त घालत होती. मध्यरात्रीपर्यंत देखाव्यांचे सादरीकरण तसेच साऊंड सिस्टीमवर तरुणाई थिरकल्याचे चित्र दिसून आले.
Source link



