लंकन महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी

बांगलादेशचा 21 धावांनी पराभव, कविशा दिलहारी सामनावीर
वृत्तसंस्था, सिलेत
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकन महिला संघाने यजमान बांगलादेशवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात लंकेने बांगलादेशवर 21 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात 15 धावांत 2 गडी बाद करणाऱ्या लंकेच्या कविशा दिलहारीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकांत 4 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकांत 5 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली.
लंकेच्याडावामध्ये कर्णधार चमारी अट्टापटूने 37 चेंडूत 6 चौकारांसह 42, इमिशा दुलानीने 25 चेंडूत 4 चौकारांसह 27, हर्षिता समरविक्रमाने 29 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 49 तर निलाक्षीका सिल्वाने 18 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 22 धावा जमविल्या. हसिनी परेराने 1 चौकारांसह 9 धावा जमविल्या. अट्टापटू आणि दुलानी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 44 धावांची भागिदारी केली. समर विक्रमा आणि सिल्वा यांनी चौथ्या गड्यासाठी 61 धावांची भार घातली. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 35 धावा जमविताना 1 गडी गमविला. 10 षटकाअखेर लंकेने 1 बाद 66 धावा जमविल्या होत्या. बांगलादेशतर्फे फरिआ त्रिष्णा, सुलतान खातुन, नाहीदा अख्तर आणि रितु मोनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात शर्मिन अख्तरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 47 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 44 धावा जमविल्या. दिलारा अख्तरने 23 चेंडूत 4 चौकारांसह 23 तर फिरदोसने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 29 धावा केल्या. कर्णधार निगार सुलताना केवळ 7 धावांवर धावचीत झाली. शोरना अख्तरने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. दिलारा अख्तर आणि फिरदोस यांनी सलामीच्या गड्यासाठी 38 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नेंदविले गेले. लंकेतर्फे कविशा दिलहारीने 15 धावांत 2 गडी बाद केले तर बांगलादेशचे इतर तीन फलंदाज धावचीत झाले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 46 धावा जमविल्या. 10 षटकाअखेर त्यांची स्थिती 2 बाद 67 अशी होती.
संक्षिप्त धावफलक: लंका 20 षटकांत 4 बाद 154(हर्षिता समरविक्रमा 49, चमारी अट्टापटू 42, दुलानी 27, निलाशिका सिल्वा नाबाद 22, अवांतर 5, फरीया त्रिष्णा, सुलताना खातुन, नाहीदा अख्तर व रिटू मोनी प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 20 षटकांत 5 बाद 133 (शर्मिन अख्तर नाबाद 44, दिलारा अख्तर 23, फिरदोस 29, शोरना अख्तर 12, रिटू मोनी नाबाद 9, अवांतर 9, कविशा दिलहारी 2-15).
Source link



