राहुल गांधींची मोंडकर परिवारासोबत जिव्हाळ्याची भेट; अरविंद मोंडकर भारावले

मालवण : नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा समारोप कौटुंबिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या शिबिरादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या परिवाराची आवर्जून भेट घेत संवाद साधला.
राहुल गांधी यांनी स्वतःहून मोंडकर यांच्या परिवाराची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी दिवसभर पदाधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्यासोबत झालेली ही कौटुंबिक भेट आपल्यासाठी भावनिक आणि अविस्मरणीय असल्याची भावना अरविंद मोंडकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बंटी पाटील, विश्वजित कदम यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. गांधी विचार, संविधानिक मूल्ये, पक्ष संघटन तसेच सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा या प्रशिक्षणातून मिळाल्याचे मोंडकर यांनी सांगितले. शिबिरात सहभागी झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.
‘ही भेट राजकीय नव्हे, तर आपुलकीची’
राजकीय जीवनात राहुल गांधी यांची यापूर्वी अनेकदा भेट झाली आहे. मात्र, यावेळची भेट विशेष ठरली. ही भेट केवळ राजकीय स्वरूपाची नव्हती, तर परिवारासोबतची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भेट होती. राहुल गांधी यांच्या संवादातून वेगळाच आपलेपणा जाणवला आणि हा क्षण भावनिक असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.
“राहुलजींनी स्वतःहून आमच्या परिवाराची भेट घेणे हा आमच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. त्यांच्या या आपुलकीमुळे पक्ष संघटनेत काम करण्यासाठी आम्हाला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाली,” अशी भावना अरविंद मोंडकर यांनी व्यक्त केली.
सातवे प्रशिक्षण शिबिर
हे शिबिर आपल्या राजकीय प्रवासातील सातवे प्रशिक्षण शिबिर असल्याचेही मोंडकर यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या कौटुंबिक संवादामुळे यावेळचे शिबिर कायम विशेष लक्षात राहील, असे त्यांनी नमूद केले. या प्रशिक्षण शिबिराचे उत्तम नियोजन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचेही अरविंद मोंडकर यांनी आभार मानले.
राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या या कौटुंबिक संवादावेळी अरविंद मोंडकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ॲड. अमृता मोंडकर, बहीण प्रतिभा (निशा संदीप लाड), सहकारी मित्र देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस आणि सौ. रुपाली फर्नांडिस उपस्थित होते.
Source link



