परिचारिकांच्या टाचदुखीवर दूरस्थ फिजिओथेरपी प्रभावी; डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता

कुडाळ : वार्ताहर : परिचारिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या ‘प्लांटर फॅशायटिस’ या टाचदुखीच्या विकारावर प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता दूरस्थ पद्धतीने अर्थात ‘टेलिरिहॅबिलिटेशन’द्वारे केलेले फिजिओथेरपी उपचार प्रभावी ठरत असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. कुडाळ येथील बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.
हे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ड्रग डिलिव्हरी टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रेवती नाईक, श्रुतिक चव्हाण आणि निकिता परब यांनी हे संशोधन पूर्ण केले.
परिचारिकांना दीर्घकाळ रुग्णालयातील कठीण फरशीवर उभे राहून काम करावे लागते. त्यामुळे टाचेच्या भागातील स्नायू आणि संबंधित ऊतींवर ताण येऊन ‘प्लांटर फॅशायटिस’मुळे टाचदुखीचा त्रास होऊ शकतो. कामाचा व्यस्त वेळ, उपचारासाठी लागणारा खर्च आणि रुग्णालयात नियमित जाण्याची अडचण यामुळे अनेकदा उपचार अपूर्ण राहतात. यावर पर्याय शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.
60 परिचारिका विद्यार्थिनींवर अभ्यास
संशोधकांनी दीर्घकाळ टाचदुखीचा त्रास असलेल्या 60 परिचारिका विद्यार्थिनींची निवड करून त्यांचे दोन गट केले. सहा आठवडे चाललेल्या या अभ्यासात पहिल्या गटातील सहभागी विद्यार्थिनींना फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली ‘झूम’ या व्हिडिओ माध्यमातून प्रत्यक्ष ऑनलाइन सत्रांद्वारे व्यायाम शिकविण्यात आले.
दुसऱ्या गटातील सहभागी विद्यार्थिनींना चित्रांसह माहितीपत्रक (ब्रोशर) देण्यात आले. त्याद्वारे त्याच व्यायामांचा घरी स्वतंत्रपणे सराव करण्यास सांगण्यात आले.
दोन्ही गटांमध्ये वेदना कमी
अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, दोन्ही गटांमध्ये टाचदुखीच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. वेदनेची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘न्युमरिकल पेन रेटिंग स्केल’नुसार, झूमद्वारे मार्गदर्शन मिळालेल्या गटाचा सरासरी वेदना गुणांक 5.33 वरून 1.63 पर्यंत कमी झाला. तर माहितीपत्रकाद्वारे व्यायाम करणाऱ्या गटाचा वेदना गुणांक 5.77 वरून 2.53 पर्यंत घसरला.
दोन्ही गटांतील सहभागींच्या शारीरिक कार्यक्षमतेतील अडथळेही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आढळले. झूमद्वारे थेट मार्गदर्शन मिळालेल्या गटाला किंचित अधिक फायदा झाला; मात्र दोन्ही पद्धतींमधील फरक सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण नसल्याचे संशोधकांनी नमूद केले.
प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत
या संशोधनामुळे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शारीरिक व्याधींवर उपचार करण्याच्या पद्धतीत दूरस्थ पुनर्वसन सेवांचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे. रुग्णालये आणि विविध आस्थापनांना डिजिटल आरोग्य सुविधांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचवून पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देणे शक्य होऊ शकते.
ज्या रुग्णांना प्रत्यक्ष क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी दूरस्थ फिजिओथेरपीची ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, असा निष्कर्ष या अभ्यासातून समोर आला आहे.
या संशोधनाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सीईओ अमृता गाळवणकर तसेच सहकाऱ्यांनी डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
Source link



