रामदुर्गमध्ये झोपडपट्टी विकास योजनेत भ्रष्टाचार

लोकायुक्त पोलिसांचे 7 अधिकाऱ्यांवर एकाचवेळी छापे, 23 कोटींहून अधिकचा गैरव्यवहार
बेळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रामदुर्ग तालुक्यातील झोपडपट्टी प्रदेशात राबविण्यात आलेल्या योजनेत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मंगळवारी लोकायुक्त पोलिसांनी सात अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाचवेळी छापे टाकले. विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. रामदुर्ग तालुक्यात झोपडपट्टी भागात राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत झोपडपट्टी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात निधी हडप केला आहे. सदर योजनेंतर्गत 600 घरे बांधण्यात आल्याचे कागदपत्रांद्वारे दाखविण्यात आले आहे.
मात्र, अनेक जणांनी स्वत:च्या खर्चातून घरे बांधली असल्याचे लोकायुक्तांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला हाताशी धरून सदर घरे सरकारा निधीतून बांधल्याची खोटी कागदपत्रे व बिले तयार करून सुमारे 23 कोटी 35 लाख 42 हजार रुपयांचा निधी लाटला असल्याचे लोकायुक्तांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे शासकीय योजनांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आल्याने लोकायुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्ना देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी एकाचवेळी सात अधिकाऱ्यांच्या घरांवर व कार्यालयांवर छापेमारी करून तपासणी केली. हाती लागलेली विविध कागदपत्रे जप्त करून त्यांची तपासणी केली जात आहे.
Source link



