Uncategorized

‘रत्नागिरी-८’ भात बियाण्याची तातडीने चौकशी करा; शेतकऱ्यांना भरपाई द्या; पं. स. सदस्य योगेश धुरी यांची मागणी; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढण्याचा इशारा

कुडाळ : वार्ताहर; माणगाव खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी महा ॲग्रो कंपनीचे ‘रत्नागिरी-8’ जातीचे भात बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. या बियाण्याचा पीक कालावधी साधारण चार महिन्यांचा असल्याचे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात पीक अवघ्या दोन महिन्यांतच परिपक्व होण्यास सुरुवात झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवासेना (उबाठा) कुडाळ तालुकाप्रमुख तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी केली आहे.

याबाबत तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांना निवेदन देण्यात आले. माणगाव खोरे हे भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांचे भात पीक हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी ‘रत्नागिरी-८’ बियाण्याचा वापर केला आहे. मात्र अपेक्षित कालावधीच्या तुलनेत पीक लवकर परिपक्व होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कापणीपूर्व अवस्थेत पाऊस झाल्यास भाताच्या लोंब्या जमिनीवर पडणे, दाण्यांची गुणवत्ता खराब होणे तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने प्रत्यक्ष पीक पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी योगेश धुरी यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित बियाण्याची गुणवत्ता, त्याचा अपेक्षित पीक कालावधी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती याबाबत कृषी विभागाने सखोल चौकशी करावी. चौकशीत बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित कंपनीकडून नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी. तसेच कंपनीविरोधात आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, काही शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीची पावती उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ पावती नसल्याच्या कारणावरून कोणत्याही शेतकऱ्याला नुकसानभरपाईपासून वंचित ठेवू नये. संबंधित विक्रेत्याच्या विक्री रजिस्टर, स्टॉक रजिस्टरमधील नोंदी, उपलब्ध कागदपत्रे तसेच प्रत्यक्ष पीक पाहणीच्या आधारे शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यांनाही न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभागप्रमुख एकनाथ धुरी, उपविभागप्रमुख शैलेश विर्णोडकर तसेच माणगाव तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील सावंत उपस्थित होते.

“शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरा जात आहे. बियाण्यामुळे त्याचे नुकसान झाले असेल तर त्याला न्याय मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना विनाकारण कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावू नयेत. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढू,” असा इशारा योगेश धुरी यांनी दिला.

कृषी विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पीक पाहणी, पंचनामा व चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​