Uncategorized

मालवणात सागरी किल्ले अध्ययन केंद्र स्थापनेला गती

अतुल काळसेकरांचा सातत्याने पाठपुरावा ; संस्थेकडून कृतज्ञतापूर्वक सत्कार

मालवण : प्रतिनिधी

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन होणार असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. आशिषजी शेलार यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत या केंद्राची घोषणा केल्यानंतर महाविद्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासन तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केंद्र सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. दरम्यान सदर अध्ययन केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाच्या व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक, ओरोस कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. मल्लेश खोत व प्रा. शंकर खोबरे आणि श्री. शैलेंद्र दळवी उपस्थित होते.श्री. अतुल काळसेकर यांचा चंद्रशेखर कुशे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे यांनी त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. यावेळी श्री. अतुल काळसेकर यांनी या अध्ययन केंद्राच्या पुढील कार्यवाहीसाठी शुभेच्छा दिल्या. सागरी किल्ल्यांचा इतिहास, वारसा आणि संशोधन यांना नवे परिमाण देणारे हे अध्ययन केंद्र भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे संशोधन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट व पद्मदुर्ग या सागरी किल्ल्यांचे ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय व सांस्कृतिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला यंदा ३५९ वर्षे पूर्ण झाली असून नुकताच त्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर मालवणमधील सिंधुदुर्ग तसेच इतर सागरी किल्ल्यांवरील शास्त्रशुद्ध अभ्यास, संशोधन व दस्तऐवजीकरणासाठी हे अध्ययन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मालवण हे या सर्व किल्ल्यांचे केंद्रस्थळ असल्याने येथून या किल्ल्यांचा अभ्यास व व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे.या अध्ययन केंद्रामार्फत जलदुर्गांचा इतिहास, मराठा आरमाराची रणनीती, स्थापत्यशैली व सांस्कृतिक प्रभाव यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. मोडी, पर्शियन व पोर्तुगीज भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे संकलन व भाषांतर, किल्ल्यांचे डिजिटायझेशन (३D स्कॅनिंग, नकाशे), विविध संशोधन प्रकल्प तसेच ‘सागरी किल्ले वारसा, संवर्धन व व्यवस्थापन’ या विषयावरील अभ्यासक्रम राबविण्याचे नियोजन आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासदौरे, कार्यशाळा, सेमिनार, संशोधन शिष्यवृत्ती तसेच स्थानिक लोककला व परंपरांचे संकलन यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत. QR कोड आधारित माहिती प्रणाली व संग्रहालय निर्मितीद्वारे पर्यटकांना माहिती उपलब्ध करून देण्याचाही मानस आहे.या केंद्रामुळे स्थानिक युवकांना संशोधन व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल तसेच मालवण हे “फोर्ट टुरिझम डेस्टिनेशन” म्हणून विकसित होण्यास मदत होईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी धोरणाचा अभ्यास व प्रचार व्यापक पातळीवर करता येणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​